भारतीय नौदलाची तीन जहाजे मदतीसह रवाना

श्रीलंकेत १९७० नंतर आलेल्या सर्वात भीषण पुरात आतापर्यंत १००हून अधिक  लोक मृत्युमुखी पडले असून भारतीय नौदलाचे जहाज मदत साहित्य घेऊन कोलंबोला पोहोचले आहे. श्रीलंकेत आणखी मोठय़ा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन केंद्राने केळणी नदीकिनारी राहणारे लोक, कोलोनवा, काडुवेला, वेलामपिटिया, केळनिया, बियागामा, सेडावट्टे, डोम्पे, हानवेला, पदुक्का, अविसावेला या विभागीय सचिवालयांच्या हद्दीत येणाऱ्या गावातील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा दिला आहे.१९७० नंतरचा हा सर्वात भीषण पूर असल्याचे आपत्ती निवारण केंद्राचे मंत्री दुनेश गनकांडा यांनी सांगितले.

आतापर्यंत १४ जिल्ह्य़ांतील  ५२६०३ कुटुंबातील २००३८३ लोकांना पुराचा फटका बसला असून २९३७ कुटुंबातील १२००७ जणांना शनिवारी सकाळी ६९ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. यात १०० हून अधिक मृत्यूमुखी पडले  असून ११० जण बेपत्ता आहेत. श्रीलंकेच्या तीनही सेनादलाचे एक हजार जवान मदतकार्यात सहभागी आहेत. श्रीलंका हवाई दलाचा एक जवान मदतकार्याच्या वेळी गल्ले येथील नेलुवा येथे हेलिकॉप्टर कोसळून मरण पावला आहे. हवामान खात्याने पाऊस व सोसाटय़ाचे वारे कायम राहतील असा अंदाज दिला आहे. श्रीलंकेचे पराष्ट्र मंत्रालय व आपत्ती-व्यवस्थापन मंत्रालय यांच्यात मदतकार्याबाबत समन्वय आहे. इंटरनॅशनल सर्च अॅण्ड रेस्क्यू अॅडव्हायजरी ग्रुप (इन्सरग) व  शेजारी देशांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. भारताने नौदलाची तीन जहाजे मदत साहित्यासह रवाना केली आहेत. सकाळी पहिले जहाज कोलंबो बंदरावर दाखल झाले. श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री रवनी करुणानायके हे जहाज आले तेव्हा उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, आम्ही मदतीसाठी भारताचे आभारी आहोत. भारत व श्रीलंका संबंध उत्तम पातळीवर आहेत हेच यातून दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. आयएनएस किर्च हे जहाज कोलंबोकडे वळवण्यात आले व मदत पोहोचती करण्यात आली. भारतीय उच्चायुक्त तरणजित सिंग संधू यांनी मदतकार्यातील काही वस्तू प्रतीकात्मकरीत्या परराष्ट्रमंत्री करुणानायके यांच्याकडे सुपूर्द केल्या. भारताची आयएनएस शार्दूल व आयएनएस जलशवा ही दोन जहाजे औषधे व पाणी घेऊन श्रीलंकेकडे रवाना झाली आहेत. वैद्यकीय पथके व बोटी, हेलिकॉप्टर्स आयएनएस जलशवा मार्फत तेथे पाठवण्यात आली आहेत असे नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी. के. शर्मा यांनी सांगितले. मे २००३ पेक्षा आताचा पूर मोठा आहे. त्या वेळी २५० मृत्युमुखी पडले होते तर १० हजार लोक बेघर झाले होते. नैर्ऋत्य मान्सूनच्या पावसाने तेव्हाचा व आताचा पूर आला आहे.