उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरजवळील खतौली येथे पुरी-उत्कल एक्स्प्रेसचे सहा डबे रेल्वे रुळांवरून घसरले आहेत. या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेमागे दहशतवाद्यांचा हात आहे का, याचा तपास करण्यात येत आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. हा अपघात आहे की घातपात याची बारकाईने चौकशी करणार आहेत.

याआधीही भारतीय रेल्वे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. अलिकडेच बिहारमध्ये रेल्वेगाडी उडवून देण्यासाठी दहशतवाद्यांनी रुळांवर स्फोटके ठेवल्याचे स्पष्ट झाले होते. पण दहशतवाद्यांचा हा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला होता. दुबईहून अटक केलेल्या शमसुल हुदा या दहशतवाद्यानेही भारतातील दहशतवादी हल्ल्यांच्या कटांबाबत माहिती दिली होती. भारतीय रेल्वे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना असलेल्या आयएसआयच्या निशाण्यावर असल्याची कबुली त्याने सुरक्षा यंत्रणांकडे दिली होती. बिहारमधील घोडासहनमध्येही दहशतवाद्यांनी रेल्वे रुळांवर बॉम्ब ठेवला होता. त्यावेळीही सुरक्षा यंत्रणांनी कट उधळून लावला होता. तर यावर्षी कानपूरमध्येही रेल्वेगाडीमध्ये कमी क्षमतेचा स्फोट घडवून आणला होता.

दरम्यान, अपघातग्रस्त एक्स्प्रेस पुरीवरुन हरिद्वारला निघाली होती. ती शनिवारी रात्री आठच्या सुमारास निश्चित स्थळी पोहोचणार होती. ही एक्स्प्रेस संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास मेरठ-मुजफ्फरनगरदरम्यान खतौलीजवळ पोहोचली असता सहा डबे रुळांवरुन घसरले. दोन डबे एकमेकांवर चढले होते. तर एक डबा रेल्वे रुळालगतच्या घरात घुसला. अपघातात अनेक जण जखमी आहेत. रेल्वेचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफची तुकडीही मुजफ्फरनगरच्या दिशेने रवाना झाली. उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकही रवाना झाले आहे.