देशातील गरिबांतील गरीब व्यक्तीसाठी आपले सरकार काम करीत आहे, बडय़ा उद्योगपतींसाठी नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यसभेत स्पष्ट केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदी यांनी या वेळी विरोधकांनी केलेल्या सर्व आरोपांचा समाचार घेतला. आपले सरकार सत्तेवर आहे याचा अर्थ आम्हाला सर्व ज्ञात आहे, असा दावा आम्ही केलेला नाही, असे स्पष्ट करून मोदी यांनी विरोधकांकडूनही सहकार्याची अपेक्षा केली.
देशातील प्रत्येकाने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. लोकशाहीत धमक्यांना कोणीही धूप घालत नाही. आणीबाणीच्या काळातही देश झुकला नाही, असेही मोदी म्हणाले. एनडीए सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या काही योजना पूर्वीच्या यूपीए सरकारच्याच आहेत, या विरोधकांच्या टीकेलाही मोदी यांनी उत्तर दिले. काही योजना जुन्याच असल्याची टीका होते, मात्र योजना जुन्या आहेत की नव्या, हा प्रश्न नाही, तर समस्या जुन्याच आहेत हा प्रश्न आहे. त्यामुळे त्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
जनधन योजनेद्वारे आम्ही गरिबांसाठी बँक खाती सुरू केली. ही योजना बडय़ा उद्योगसमूहांसाठी आहे का? गरीब कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी शाळेत शौचालये बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे, श्रीमंतांच्या घरातील मुले या शौचालयांचा वापर करणार आहेत का? २०२२ पर्यंत ग्रामीण भागांत तीन लाख घरे आणि शहरी भागांत दोन लाख घरे बांधण्याचे लक्ष्य गाठण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. भाजप हा सवर्णाचा अथवा हिंदीभाषक पट्टय़ातील पक्ष नाही, तर ज्या राज्यात ख्रिश्चन, शीख आणि मुस्लीम मतदार जास्त आहेत तेथे पक्ष सत्तेवर आहे, असेही ते म्हणाले.
कोळसा खाणींच्या लिलावातून मिळणारा निधी संबंधित राज्यांना मिळणार आहे, त्यामुळे त्या राज्याच्या विकासालाच मदत होणार आहे. याचा लाभ उद्योगसमूहांना होणार आहे का? आपल्याकडे मनुष्यबळ आहे; पण त्यासाठी लागणारे कौशल्य नाही, त्यामुळे कौशल्यविकासामुळे गरिबांतील गरीब व्यक्तीला लाभ होईल. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही, त्यामुळे काँग्रेसशासित राज्यांनी राष्ट्रीय प्रश्नावर आमच्यासमवेत यावे, असे आवाहनही या वेळी मोदी यांनी केले.
नोकरशहांच्या मोठय़ा प्रमाणावर बदल्या करण्यात आल्याची टीका आमच्यावर करण्यात आली. काँग्रेसला ही बाब चांगलीच झोंबली असावी, परंतु २००४ मध्ये कॅबिनेट सचिव, गृह सचिव, संरक्षण सचिव यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या याचे स्मरण मोदी यांनी करून दिले. राज्यपालांचा अवमान करून त्यांनाही पदावरून दूर करण्यात आले होते. नीती आणि रीतीमुळेच विकास होऊ शकतो. त्यामुळे मेक इन इंडिया कार्यक्रम पुढे नेऊन, पायाभूत सुविधांचा विकास करून रोजगारनिर्मिती केली पाहिजे, असेही ते म्हणाले.