राष्ट्रपतीनियुक्त असल्याने स्वतंत्र बसण्याचा निर्णय

राष्ट्रपतीनियुक्त भाजपचे खासदार नवज्योतसिंह सिद्धू यांनी खासदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला असतानाच नरेंद्र मोदी सरकारने राज्यसभेवर नियुक्त केलेले महाराष्ट्रातील खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनीही भाजपचे सदस्यत्व न स्वीकारण्याची भूमिका घेतल्याचे समजते. राज्यसभेत स्वतंत्र बसण्याचे त्यांनी ठरविल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रपतीनियुक्त आणखी एक खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.

डॉ. जाधव यांची राज्यसभेवरील वर्णी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रयत्नातून झाली होती.  मात्र, असे असताना भाजपचे सदस्यत्व स्वीकारण्याबाबत डॉ. जाधव उत्सुक नसल्याचे समजते आहे. आपण राष्ट्रपतीनियुक्त आहोत आणि त्यामुळे राज्यसभेत स्वतंत्रच बसणार, अशी त्यांची भूमिका असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते. भाजपचा शिक्का नको, अशी सुरक्षित भूमिका त्यांची असल्याचे समजते.

कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजे यांनाही मोदी सरकारने राष्ट्रपतीनियुक्त खासदार केले आहे. मात्र, भाजपचे अधिकृत सदस्यत्व स्वीकारण्याबाबत त्यांनी निर्णय घेतलेला नाही. ‘‘मला अद्याप तसा प्रस्ताव आलेला नाही. तो आल्यास मी विचार करून निर्णय करेन. मात्र, माझी नियुक्ती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझा सन्मान केलेला आहे,’’ असे त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. सदस्यत्व घेतल्यास जनहिताची कामे करणे अधिक सोपे जाईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

राष्ट्रपतीनियुक्त खासदारांना सत्तारूढ पक्षाचे सदस्यत्व स्वीकारण्याचे कोणतेही बंधन नसते. जर सदस्यत्व स्वीकारले तर मग पक्षादेश बंधनकारक असतो. मोदी सरकारने नियुक्त केलेल्या सहा सदस्यांपैकी (सिद्धू यांनी राजीनामा दिल्यामुळे एक जागा रिक्त होणार आहे.) डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारलेले आहे.