नरेंद्र मोदी यांची ग्वाही ; सत्ताधारी कॉंग्रेसवर टीकास्त्र

मणिपूर विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर आल्यास राज्याची आर्थिक नाकाबंदी संपुष्टात आणू, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी प्रचार सभेत दिली. सत्ताधारी कॉंग्रेसने गेल्या १५ वर्षांत जे केले नाही ते सत्तास्थापनेनंतरच्या १५ महिनांत करण्याचे आश्वासन देत मोदी यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

मोदी यांनी प्रचार सभेत कॉंग्रेससह मुख्यमंत्री ओ. इबोबी सिंग यांना लक्ष्य केले. ‘‘कॉंग्रेसच्या सत्ताकाळात मणिपूरचा विकास खुंटला आहे. पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती आदी आघाडय़ांवर हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. इबोबी सिंग हे सर्वात भ्रष्ट सरकार चालवत आहेत” अशी टीका मोदी यांनी केली.

मणिपूरमध्ये युनायटेड नागा कौन्सिलने केलेल्या आर्थिक नाकाबंदीचे खापर मोदींनी राज्य सरकावरच फोडले. ‘‘अनेक महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील जनतेला औषधांसह इतर वस्तूंचा पुरवठाही होत नाही. त्याबाबत कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नसून, कॉंग्रेसने नाकाबंदी करणाऱ्यांशी हातमिळवणी केली आहे’’ असा आरोप मोदी यांनी केला.  ‘‘राज्यात भाजपची सत्ता आली तर अशी नाकाबंदी करू दिली जाणार नाही आणि सरकार कसे चालवावे हे आम्ही दाखवून देऊ,’’ असे मोदी म्हणाले.

नागा कराराबाबत कॉंग्रेस सरकार जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही मोदी यांनी केला. एका जमातीला दुसऱ्या जमातीविरोधात झुंजवत ठेवून त्यावर कॉंग्रेसला आपली राजकीय पोळी भाजायची आहे, अशी टीका त्यांनी केली.

केंद्रात कॉंग्रेसची सत्ता असताना केंद्राकडून येणाऱ्या निधीवर राज्यातील सत्ताधारी मंत्री डल् ला मारायचे. मात्र, आता केंद्रात भाजप सरकार असून, केंद्राकडून मिळणाऱ्या प्रत्येक रुपयाचा हिशेब मणिपूर सरकारला द्यावा लागेल, असेही मोदी यांनी या वेळी बजावले. मणिपूर विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत होणार असून, ४ मार्च आणि ८ मार्चला मतदान होणार आहे.