हार्ट ऑफ एशियापरिषदेत मोदी- अशरफ घनी यांची चर्चा

सीमेपलीकडून पसरवल्या जाणाऱ्या दहशतवादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी महत्त्वांच्या प्रश्नांवर द्विपक्षीय चर्चा केली आहे त्यात सीमेपलीकडून दहशतवाद व दहशतवाद विरोधी सहकार्य या मुद्दय़ांचा समावेश आहे.

बैठकीत दोन्ही नेत्यांनी कौशल्य विकास पायाभूत सुविधा व इतर क्षेत्रात १ अब्ज डॉलर्स खर्चून द्विपक्षीय सहकार्य करण्याचे मान्य केले. त्यात हवाई मार्गिकेचाही समावेश आहे. हवाई मार्गिकेमुळे भारताला अफगाणिस्तानमध्ये मोठे स्थान मिळणार असून पाकिस्तानने त्यांच्या देशातील मार्गाने जाऊ देण्यास नेहमीच आडकाठी केली आहे. दोन्ही नेत्यांनी मैत्रीपूर्ण संबंधांवर चर्चा केली असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले.

आर्थिक पातळीवर द्विपक्षीय संबंध वाढवणे व दोन्ही देशातील भागीदारी विकसित करणे यावर आढावा घेण्यात आला. दहशतवादाच्या सामायिक प्रश्नावर दोन्ही नेत्यांनी संयुक्त राष्ट्रे व इतर मंचांवर सहकार्य वाढवण्याची भूमिका घेतली. भारताने गेल्या महिन्यात इस्लामाबादमधील सार्क बैठकीतून माघार घेतली होती. पाकिस्तानच्या सीमेवरून पसरवल्या जाणाऱ्या दहशतवादाविरोधात भारताने हे पाऊल उचलले होते. अफगाणिस्तान व सार्क देशांनीही आठ देशांची ही बैठक दहशतवादामुळे रद्द करण्याची मागणी केली होती.

द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी भारत अफगाणिस्तान दरम्यान हवाई मार्गिका सुरू करण्यावर मतैक्य झाले त्याचबरोबर १ अब्ज डॉलर्स खर्चून द्विपक्षीय सहकार्यातील इतर बाबी पूर्णत्वास नेल्या जातील त्यात कौशल्य विकास व पायाभूत सुविधांचा समावेश आहे. हार्ट ऑफ आशिया परिषदेसाठी घनी यांचे काल येथे आगमन झाले. सुवर्णमंदिराची भेट हा हलवून टाकणारा अनुभव होता असे त्यांनी सांगितले. शांतता व स्थिरतेला भारताचा नेहमीच पाठिंबा राहील असे मोदी यांनी घनी यांना सांगितले असून अफगाणिस्तानने लष्करी सामुग्री भारताकडून घेण्याचे मान्य केले आहे.

अझीझ-मोदी शुभेच्छांची देवाणघेवाण; चर्चा अनिश्चितच

अमृतसर : भारत-पाकिस्तान सीमारेषेवरील तणाव वाढलेला असतानाही पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री अझीझ सरताज हार्ट ऑफ एशिया परिषदेच्या निमित्ताने अमृतसर येथे आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांनी हस्तांदोलन केले. शुभेच्छांची देवाणघेवाण केली. अझीझ भारतात आले असले तरी नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठकीबाबत अद्याप काहीही ठरविण्यात आलेले नाही. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणावाची परिस्थिती कायमच राहणार असल्याचे चित्र आहे. अझीझ यांनी उपचार घेत असलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना संदेश पाठवून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.