पंतप्रधान मोदी यांची टीका; संसदेतील कोंडीचे खापर विरोधकांवर

निश्चलनीकरणावरून संसदेत गदारोळ करणाऱ्या विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लक्ष्य केले. निश्चलनीकरणाबाबत लोकसभेत बोलण्यास तयार असूनही विरोधक बोलू देत नसल्याने ‘जनसभे’त बोलणे भाग पडत असल्याचे स्पष्ट करत मोदी यांनी संसदेतील कोंडीचे खापर विरोधकांवर फोडले. त्याच वेळी निश्चलनीकरणामुळे नागरिकांना आणखी काही दिवस त्रास होणार असला तरी निर्णयापासूनच्या ५० दिवसांनंतर परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

गुजरातमध्ये बनासकांठा येथे एका कार्यक्रमात मोदींनी निश्चलनीकरणाच्या निर्णयाचे समर्थन करतानाच विरोधकांवर टीकास्त्र सोडले. संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार नेहमीच तयार आहे. मात्र विरोधकांचा खोटारडेपणा उघडा पडेल, या भीतीने ते संसदेचे कामकाज चालू देत नाहीत, असा आरोप मोदी यांनी केला. पंतप्रधान या मुद्दय़ावर बोलण्यास तयार असल्याचे आश्वासन सरकारने देऊनही विरोधकांचा गदारोळ सुरूच आहे. त्यामुळेच मी ‘जनसभे’त बोलण्याचा निर्णय घेतला. मात्र संधी मिळताच मी देशातील १२५ कोटी लोकांचा आवाज लोकसभेत उठवेन, असे मोदी म्हणाले. संसदेतील गोंधळाबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलेल्या नाराजीकडेही त्यांनी लक्ष वेधले. निश्चलनीकरणाचा निर्णय सामान्य नाही, हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे. हा कठीण निर्णय होता. या निर्णयामुळे जनतेला काही दिवस त्रास होईल, हे गृहीतच होते. मात्र निर्णयाच्या ५० दिवसांनंतर परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात होईल, अशी ग्वाही मोदी यांनी दिली. निश्चलनीकरणामुळे दहशतवाद, नक्षली चळवळीचे कंबरडे मोडले आहे. बनावट नोटांद्वारे दहशतवाद पोसला जात असल्याने या निर्णयाद्वारे मी दहशतवादाशी लढा दिल्याचे सांगत मोदी यांनी निश्चलनीकरणाचे ठाम समर्थन केले.

मोदी म्हणाले..

  • खोटारडेपणा उघडा पडेल या भीतीने विरोधक संसदेचे कामकाज रोखून धरत आहेत.
  • निश्वलनीकरणाच्या निर्णयापासून ५० दिवसांनंतर परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरूवात होईल.
  • निश्चलनीकरणाची अंमलबजावणी लांबणीवर टाका, असे काही जणांनी सांगितले होते.
  • माझ्यावर टीका करा, जनतेच्या अडचणीही मांडा, पण रोकडरहित व्यवहाराद्वारे जनतेला रांगेत उभे रहावे लागणार नाही, हेसुध्दा सांगा.