पक्षाचा विस्तार करण्यासाठी विरोधी पक्षांतील कार्यकर्त्यांना आम्ही गुणदोषांसह स्वीकारतो. अगदी गुन्हेगार असला तरी भाजपचा परीसस्पर्श झाल्यावर वाल्याचा वाल्मीकी करण्याचा आम्हाला विश्वास आहे, अशा शब्दांत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुंडपुंड किंवा वादग्रस्त पाश्र्वभूमी असलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. सत्तेत आल्यानंतर गेल्या तीन वर्षांत भाजपने अनेकांना पावन करून घेतले. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाबद्दल एकेकाळी आवाज उठविणाऱ्या भाजपने आता गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्यांना लाल गालिचा अंथरला आहे.

  • एस. एम. कृष्णा हे कर्नाटकचे मुख्यमंत्री असताना बंगळूरुमधील जमीन वाटपप्रकरणी भाजपने त्यांच्याविरुद्ध आवाज उठविला होता. जमीन घोटाळाप्रकरणी कृष्णा यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून करण्यात आली होती. पुढील वर्षी होणारी कर्नाटक विधानसभेची निवडणूक लक्षात घेता वोकलिंग समाजातील कृष्णा यांना भाजपने पक्षात प्रवेश दिला.
  • टेलिकॉम घोटाळाप्रकरणी शिक्षा झालेला माजी मंत्री सुखराम हे कधीकाळी भाजपच्या जवळ गेले होते
  • महाराष्ट्रात संजय गांधी निराधार योजनेतील घोटाळा प्रकरणात माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यावर चौकशी समितीने ठपका ठेवला होता. गावित यांच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. त्याच गावित यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी दिली आणि ते आमदार झाले.
  • भाजपचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी १९९०च्या दशकात उल्हासनगरमधील कुख्यात पप्पू कलानीच्या विरोधात आकाश-पाताळ एक केले होते. त्याच कलानीच्या मुलाबरोबर भाजपने उल्हासनगर महापालिका निवडणुकीत हातमिळवणी केली होती.
  • राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतांचे गणित जुळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्याच आठवडय़ात आंध्र प्रदेशमधील वादग्रस्त नेते आणि बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याबद्दल तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांना भेटीसाठी वेळ दिला होता.
  • बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तुरुंगाची हवा खाऊन आलेले आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात बंडाचे निशाण फडकविणारे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याकडे भाजपने पुन्हा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली.
  • बिहारमध्ये जनता दल(यू)चे वादग्रस्त नेते भीमसिंग यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता.
  • केंद्रातील १२ मंत्र्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल, आम आदमी पक्षाने नावांसह आरोप केला होता
  • पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये गुन्हेगारी पाश्र्वभूमी, पोलिसांवर हल्ले, घातपाती कारवाया असे आरोप असलेले अनेक जण भाजपमध्ये दाखल.
  • पुण्यात बोडके, शेलार आदी गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्यांची भाजपशी संबंध
  • ठाण्यात शिंदे नावाच्या गुंडाला प्रवेश.