खादी व ग्रामोद्योग आयोगाने दिनदर्शिका व नोंदवह्य़ांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र वापरून कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नाही. तसेच, महात्मा गांधी यांचे छायाचित्र न वापरण्यामागे कोणत्याही नव्या धोरणाचा भाग नसल्याचेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. खादी व ग्रामोद्योग आयोगाने १९९६, २००२, २००५, २०११, २०१३ आणि २०१६ या वर्षी महात्मा गांधी यांचे छायाचित्र वापरले नव्हते, अशी माहिती केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी दिली आहे. खादी व ग्रामोद्योग आयोगाने दिनदिर्शिक व नोंदवह्य़ांवर महात्मा गांधी यांच्याऐवजी पंतप्रधानांचे छायाचित्र का वापरले, या प्रश्नाला गिरिराज सिंग यांनी बुधवारी राज्यसभेत उत्तर दिले. खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या दिनदर्शिका व नोंदवह्य़ांवरील महात्मा गांधी यांचे छायाचित्र आम्ही बदलले नाही. त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांचेच छायाचित्र वापरले जावे, अशी सक्ती करणारे कोणतेही धोरण नसल्याचे गिरिराज सिंग म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र वापरण्याबाबत खादी व ग्रामोद्योग आयोगाने कोणत्याही मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन केले नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष व्ही. के. सक्सेना यांनी गिरिराज सिंग यांनी केलेल्या स्पष्टीकरणाचे स्वागत केले.