पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; ५ मे रोजी प्रक्षेपण

दक्षिण आशिया उपग्रहाचे ५ मे रोजी प्रक्षेपण करण्यात येणार असून ‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेनुसार, भारताकडून शेजारी देशांना ही अमूल्य भेट देण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली. उपग्रह प्रकल्पात सहभागी होण्यास पाकिस्तानने मात्र नकार दिला आहे.

‘‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेनुसार प्रगतिपथाकडे झेपावण्याची भारताची भूमिका आहे. ५ मे रोजी भारताकडून दक्षिण आशिया उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या प्रकल्पात सहभागी झालेल्या देशांच्या विकासात्मक गरजांच्या पूर्ततेसाठी हा उपग्रह महत्त्वाचा ठरेल’, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. दक्षिण आशियाई देशांसोबतच्या सहकार्यासाठी हा प्रकल्प मोलाचा आहे. दक्षिण आशियाबाबतच्या भारताच्या कटिबद्धतेचे हे उत्तम उदाहरण आहे. संपूर्ण दक्षिण आशियाच्या सर्वागीण विकासात हा उपग्रह महत्त्वाची भूमिका बजावेल, असे सांगत मोदी यांनी शेजारी देशांना भारताकडून ही अमूल्य भेट असल्याचे स्पष्ट केले.

दक्षिण आशिया उपग्रहाचे वजन २२३० किलो आहे. इस्रोला तो बनविण्यासाठी तीन वर्षे लागली असून, २३५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या उपग्रहामुळे शेजारील देशांना विविध सेवांचा वापर करता येणार आहे. यात दूरसंचार आणि प्रसारण सेवा, टेलिएज्युकेशन, टेलिमेडिसिन यांचा समावेश असणार आहे. हा उपग्रह गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रक्षेपित करण्यात येणार होता. मात्र त्यास विलंब झाला आहे.

पाकिस्तानचा सहभागास नकार

या उपग्रह प्रकल्पात भारताबरोबच नेपाळ, भूतान, मालदीव, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या देशांचा सहभाग असून, पाकिस्तानने सहभागास नकार देत भारताची ‘भेट’ नाकारली आहे. याआधी उपग्रहाचे नाव ‘सार्क उपग्रह’ असे ठेवण्यात आले होते. मात्र पाकिस्तानने माघार घेतली.