पाटीदार समाजाचे आरक्षणासाठी झालेले आंदोलन… त्यातूनच हार्दिक पटेलचा झालेला उदय… आंदोलकांना हाताळण्यात अपयशी ठरलेल्या आनंदीबेन पटेल यांनी काही दिवसांपूर्वीच दिलेला राजीनामा… आणि पुढच्या वर्षी होऊ घातलेली विधानसभेची निवडणूक या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवार) पटेल समाजाचे वर्चस्व असलेल्या जामनगरमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच मोदी त्यांचे घरचे मैदान असलेल्या गुजरातमध्ये जाहीर सभा घेत आहेत. या सभेमध्ये ते काय बोलणार, हार्दिक पटेलच्या मागे निघालेल्या पटेल समाजाला रोखण्यासाठी काय रणनिती आखणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जामनगर जिल्ह्यातील ध्रोलमध्ये मोदी जाहीर सभा घेणार आहेत. पटेल समाजाचे वर्चस्व असलेल्या जामनगर, राजकोट, मोर्बी या तिन्ही भागांतून या सभेसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जमणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सभेसाठी एक लाखाहून अधिक नागरिक येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. ‘सौराष्ट्र नर्मदा अवतरण सिंचन योजने’च्या उदघाटनाच्या निमित्ताने मोदी आज या ठिकाणी येत आहेत. पण या कार्यक्रमानंतर ते जाहीर सभा घेणार असल्यामुळे पुढील निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
२०१७च्या उत्तरार्धात गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. गेल्या निवडणुकांमध्ये भाजपने गुजरातमध्ये एकहाती सत्ता मिळवली होती. पण यावेळी परिस्थिती बदलली आहे. मोदी पंतप्रधान म्हणून देशाचा कारभार पाहात आहेत. तर गुजरातमध्ये पटेल समाजाच्या आरक्षणाच्या मागणीमुळे सत्ताधारी भाजपच अडचणीत सापडल्याची स्थिती आहे. आनंदीबेन पटेल यांनी वयाचे कारण देत काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर विजय रुपानी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पक्षाने सोपवली. तर उपमुख्यमंत्रीपद नितीन पटेल यांच्याकडे देण्यात आले. आगामी निवडणुकी डोळ्यासमोर ठेवूनच भाजपने गुजरातमध्ये खांदेपालट केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.