स्पाइस जेटचे तिरुपतीहून हैदराबादला येणारे विमान उतरण्याच्या बेतात असताना त्याच्या सार्वजनिक सूचना प्रणालीतून उमटले राष्ट्रगीताचे सूर. चित्रपटगृहात राष्ट्रगीत लावले जाते व त्या वेळी प्रेक्षकांना उभे राहावे लागते पण विमानातही राष्ट्रगीताच्या या प्रकाराने प्रवासी बुचकळ्यात पडले.

राष्ट्रगीत सुरू झाल्यावर उभे राहावे की पट्टा लावलेल्या स्थितीत राहावे असा अनेकांना प्रश्न पडला. १८ एप्रिलला ही घटना घडली आहे. त्यामुळे प्रवाशांनी स्पाइस जेटकडे तक्रार केली. फ्लाइट क्रमांक एसजी १०४४ च्या वेळी हे राष्ट्रगीत वाजवल्याने गोंधळ झाला. कर्मचारी व प्रवासी विमानात उभे राहून राष्ट्रगीताचा आदर करण्याच्या स्थितीत नव्हते कारण पट्टे बांधलेले होते, असे प्रवासी पुनीत तिवारी यांनी सांगितले. ते म्हणाले, की राष्ट्रगीत विमानात वाजू लागले तेव्हा लोकांना पट्टे काढणे शक्य नव्हते. एका कर्मचाऱ्याने राष्ट्रगीत वाजत असताना म्युझीक सिस्टीम बंद केली व नंतर पुन्हा चालू केली.

स्पाइस जेटच्या प्रवक्त्याने सांगितले, की या विमानात चुकून राष्ट्रगीत प्ले-लिस्टमधून निवडले गेले पण नंतर ते लगेच थांबवण्यात आले, प्रवाशांच्या गरसोयीबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. स्पाइस जेट विमानात राष्ट्रगीताचे ध्वनिमुद्रण आहे पण त्यात प्ले-लिस्ट चुकीच्या पद्धतीने वापरली गेली त्यामुळे राष्ट्रगीत चुकून वाजले असावे.