चीन किंवा पाकिस्तानपेक्षा भारतातच बसलेल्या लोकांकडून देशाला धोका आहे. हे दोन्ही देश भारताचे काहीच बिघडवू शकत नाहीत. खरा चोर तर आपल्या देशातच बसला आहे, असे वक्तव्य नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री फारूख अब्दुल्ला यांनी एका कार्यक्रमात केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे देशात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अब्दुल्लांनी अप्रत्यक्षरित्या केंद्र सरकारवर निशाणा साधल्याचे बोलले जाते.

या वेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, जेडीयूचे नेते शरद यादव उपस्थित होते. ते म्हणाले, मी मुसलमान आहे, यात कोणतीच शंका नसून मी एक हिंदुस्तानी मुसलमान असल्याचा मला अभिमान असल्याचे ते म्हणाले. मला कोणीतरी विचारावे की तुम्ही एक हिंदुस्तानी मुसलमान आहात काय ? ज्या लोकांनी भारताच्या लढाईत भाग घेतला होता. ते कोण होते ? ते मुसलमान नव्हते का ? ज्यांनी ‘छोडो भारत’ ही चळवळ सुरू केली. ती व्यक्तीही मुंबईची मुसलमानच होती. ज्यांनी तिरंग्याचा आमचा राष्ट्रीय ध्वज बनवला. ती महिलाही एक मुसलमान स्त्रीच होती. आज भारताला धोका बाहेरहून नाही. चीन आमचे काहीच करू शकत नाही. आपल्या देशातच चोर बसला आहे. त्याच्यापासूनच आपल्याला धोका आहे, असे मत अब्दुल्ला यांनी नोंदवले.