आयएसआयएस या दहशतवादी संघटनेचे काम करण्यासाठी भरती झालेल्या अरीब मजीद याच्याशी संबंधित रेकॉर्ड जपून ठेवावा, यासाठी तपासकर्त्यां राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अमेरिकेच्या एका कंपनीची मदत मागितली आहे.
एनआयएच्या एका अधिकाऱ्याने दूरध्वनी संभाषण आणि व्हिडीओ कॉलिंगची मोफत सुविधा देणाऱ्या या अमेरिकी फर्मशी संपर्क साधून रेकॉर्ड जपावा, अशी विनंती केली होती. मात्र, न्यायालयाने आदेश दिल्यावरच असे करता येईल, असे कंपनीने त्यांना सांगितले. यानंतर एनआयएने त्वरित मुंबईच्या एका न्यायालयाकडून अशा प्रकारची ‘डाटा प्रिझव्‍‌र्हेशन रिक्वेस्ट’ घेऊन ती कंपनीला पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले.अमेरिका आणि युरोपमध्ये ‘व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल’ (व्हॉइप)ची सुविधा देणाऱ्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’, ‘टँगो’ आणि ‘किक’ सारख्या सोशल नेटवर्किंग साइट्स त्यांच्या सव्‍‌र्हरवरील डाटा मर्यादित काळासाठी जपून ठेवतात. मजीद हा अशाच एका साइटवर त्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधत होता.