बंगळुरूमधील एका हॉटेलसमोर झालेल्या स्फोटाच्या तपासात राष्ट्रीय तपास पथक (एनआयए) मदत करणार असून, या घटनेशी दहशतवादी संघटनेचा संबंध आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक पुणे आणि चेन्नईला पाठविण्यात आले आहे.
सोमवारी सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत स्फोटाच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस गृहमंत्री के. जे. जॉर्ज, पोलीस महासंचालक एल. पचाऊ, शहर पोलीस आयुक्त एम. एन. रेड्डी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
समाजविरोधी घटकांनी ‘आयईडी’ साहाय्याने हा स्फोट घडवून आणला आहे. या घटनेतील काही पुरावे गोळा करण्याचे काम सध्या तपास पथके करीत आहेत. दरम्यान, दिल्लीत गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट केले. स्फोटाच्या तपासात शहर पोलिसांना राष्ट्रीय तपास पथक मदत करेल, असे जॉर्ज यांनी स्पष्ट केले. यामागे कोण आहे, हे आम्हाला पाहावे लागेल. शहराच्या मध्यवर्ती भागांत असलेल्या ‘कोकोनट ग्रोव्ह’ या हॉटेलसमोर हा स्फोट झाला आहे. या परिसरातील इमारतींमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील ‘फुटेज’ही तपासण्यात आल्याचे उपायुक्त संदीप पाटील यांनी सांगितले.