तुर्कीमध्ये कार बॉम्बस्फोटात नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार दक्षिण-पूर्व तुर्कीतील सिजरे शहरातील पोलीस मुख्यालयाजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटात एका पोलीस अधिकाऱ्यासह नऊ जणांचा मृत्यू तर ६४ जण जखमी झाले. कुर्दिस्तान वर्कस पार्टी (पीकेके) या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
हे शहर सिरिया आणि इराक या देशांच्या सीमेवर वसले आहे. या भागात कुर्दिश लोकसंख्या मोठ्याप्रमाणात आहे. हल्लेखोरांचे लक्ष्य पोलीस ठाण्यालगत असलेले चेक पाँईट होते, असे अनाडोलू या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या बॉम्बस्फोटामुळे पोलीस ठाण्याच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच पीकेकेने पोलीस आणि सैन्य दलाच्या कारवर बॉम्ब फेकले होते. गतवर्षी शांतता चर्चा अयशस्वी ठरल्यानंतर येथे हिंसाचारास सुरूवात झाली होती. तुर्की, अमेरिका आणि युरोपियन संघटनेने पीकेके संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.

सिरिया आणि इराकमध्ये कुर्दिश लोकसंख्या मोठ्याप्रमाणात आहे. बॉम्बस्फोटानंतर जखमींना उपचारासाठी त्वरीत रूग्णालयात नेण्यात आले. नुकताच तुर्कीतील गजनीटेप शहरातील एका विवाहसोहळ्यात झालेल्या आत्मघाती हल्लात ३० जणांचा मृत्यू तर ९० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. या हल्ल्यामागे आयसिसचा हात असल्याचा दावा तुर्की सरकारने केला होता.