निर्मला सीतारमन यांनी सकाळी १० च्या सुमारास अरुण जेटली यांच्याकडून संरक्षण मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार स्विकारण्यापूर्वी त्यांनी पूजा केली. त्यानंतर जेटली यांनी सीतारमन यांना मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची ओळख करुन दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्यावर विश्वास दाखवून नवीन जबाबदारी दिल्याबद्दल सीतारमन यांनी त्यांचे आभारही मानले. संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाला प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.

रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यावेळी निर्मला सीतारमन यांना कॅबिनेट मंत्रीचा दर्जा देत संरक्षण मंत्रालयाचं खातं त्यांच्याकडे सोपवण्यात आलं. त्याच दिवशी संरक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त पदभार सांभाळणारे अरुण जेटली जपान दौऱ्यावर जाणार असल्याने सीतारमन यांनी तेव्हाच पदभार स्वीकारला नव्हता. जपान दौऱ्याची सर्व तयारी झाली असल्याने ऐनवेळी हा दौरा रद्द करणे योग्य नसल्याने सीतारमन यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. यापूर्वी त्या वाणिज्य राज्यमंत्री होत्या.

सीतारमन यांनी पदभार स्विकारल्यानंतर रक्षा मंत्री या नावाने ट्विटर हँडल तयार करण्यात आलं. यापूर्वी संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याचं ट्विटर हँडलच संरक्षण मंत्रालयाचं अधिकृत अकाऊंट होतं. पदभार स्विकारल्यानंतर सीतारमन यांनी माजी सैनिकांना आर्थिक मदतीची मंजुरी दिली.
संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी स्विकारल्यानंतर रॅपिड अॅक्शन फोर्सच्या पोलीस महानिरीक्षक सीमा ढुंडिया यांनी आनंद व्यक्त केला. ‘हा एक सकारात्मक बदल आहे. एक महिला संरक्षण मंत्री झाल्याने ती तिच्या इतर साथीदारांच्या तुलनेत कुठेही कमी नाही, असा संदेश मिळतो. हा बदल स्वागतार्ह आहे,’ असे त्यांनी म्हटले.