ट्वेन्टी-२० विश्वचषकातील भारत- वेस्ट इंडिज यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर श्रीनगरच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत (एनआयटी) तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती उघड झाली आहे. या सामन्यातील भारताच्या पराभवानंतर काही काश्मिरी विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा देत फटाके फोडल्याचा आरोप इतर राज्यांतील विद्यार्थ्यांनी केला आहे. या घटनेनंतर एनआयटी प्रशासनाकडून महाविद्यालयाचा परिसर बंद ठेवण्यात आला असून विद्यार्थ्यांना वसतीगृह सोडण्याचे आदेश दिले आहेत. संस्थेतील काही विद्यार्थ्यांनी शुक्रवारी एकत्र येत आदल्या रात्री घडलेल्या घटनेबाबत संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर काही स्थानिक विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या. तसेच वसतिगृहातील खोल्यांमध्ये टेलिव्हिजनवर हा सामना बघणाऱ्या परराज्यांतील विद्यार्थ्यांना मारहाणही केल्याचा दावा येथील एका विद्यार्थ्याने केला. याशिवाय, दुसऱ्या दिवशी याच विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये एकत्र येऊन पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. यामध्ये संस्थेबाहेरील लोकांचाही समावेश होता, असेही तक्रारदार विद्यार्थ्यांनी म्हटले.
मात्र, स्थानिक विद्यार्थ्यांच्या दाव्यानुसार परराज्यांतील विद्यार्थ्यांनीच वादाची सुरूवात केली. भारत-विंडीज सामना सुरू असताना काहीजण तिरंगा हातात घेऊन ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत होते. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या एका काश्मिरी विद्यार्थ्याला त्यांनी मारहाण केली. यानंतरच वादाला तोंड फुटल्याचे, स्थानिक विद्यार्थ्याने म्हणणे आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकारात काही शिक्षक आणि विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. यावेळी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याचेही समजते.