गडकरींनी मौन सोडले; समाजाचे प्रश्न वेगाने सोडविण्याची सूचना

 

महाराष्ट्रात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे निघालेले मोर्चे देवेंद्र फडणवीस सरकारविरुद्ध नसल्याची टिप्पणी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. तसेच मराठा समाजाच्या एकाही मोर्चामध्ये ‘मुख्यमंत्री मुर्दाबाद’च्या घोषणा झालेल्या नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मराठा मोर्चानी महाराष्ट्राचे राजकारण पूर्णपणे ढवळून काढले असताना महाराष्ट्रातील राजकारणातील प्रभावी नेते असलेल्या गडकरींनी त्याबद्दल आतापर्यंत पूर्णपणे मौन बाळगलेले आहे. मात्र, एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रथमच त्रोटक स्वरूपात का होईना आपले मौन सोडले आहे. मोर्चे राज्य सरकारविरुद्ध नसल्याची गडकरींची टिप्पणी राजकीयदृष्टय़ा महत्त्वाची आहे. ब्राह्मण असल्याच्या एका कारणावरून मला मुख्यमंत्रिपदावरून हटविले जाणार असल्याचे वक्तव्य फडणवीस यांनी नुकतेच केले आहे.

आपल्या देशामध्ये अशा चळवळी होतच राहतात. काही जणांना सरकारकडून खूप काही हवे आहे. पण हे मोर्चे राज्य सरकारविरुद्ध नाहीत. एकाही मोर्चात ‘मुख्यमंत्री मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या गेलेल्या नाहीत. मराठा समाज अत्यंत शांतपणे मूक मोर्चे काढतो आहे. त्यांचे प्रश्न आहेत आणि ते आपल्याला वेगाने सोडवावे लागतील, असे ते म्हणाले.

देशापुढे गरिबी व बेरोजगारी ही दोन मुख्य आव्हाने आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर मेक इन इंडिया, स्किल इंडिया व अन्य असंख्य योजनांद्वारे ते आव्हान पेलण्याचा मात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी स्वत: नागपूरमध्ये दहा हजार रोजगार निर्माण केले.. आसमान फटा हुआ है.. सब करने की हमारी हैसियत नहीं है. सर्वकाही सरकार करू शकत नाही. सरकारला मर्यादा असतात, असेही ते म्हणाले.

पाकिस्तानी कलाकारांना बंदी घालण्याबाबत ते म्हणाले, ‘पाकिस्ताननेही आपल्या दूरचित्रवाहिन्यांवर बंदी घातली आहे. पाकबरोबर संबंध नको, असे सध्या देशातील जनमत आहे. आम्ही कलाकारांविरुद्ध नाही, पण जनतेच्या मनामध्ये पाकविरुद्ध संताप आहे. आम्हाला चांगले संबंध हवे आहेत, पण ते मात्र दहशतवादी घुसवीत आहेत.’

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीच मुख्यमंत्री फडणवीसांनी करण जोहर व मनसेमध्ये मध्यस्थी केली. कारण कायदा व सुव्यवस्था राखण्यास प्रत्येक मुख्यमंत्र्याला प्राधान्य द्यावे लागते. तोडगा कसा काढायचा, हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांचा (प्रयत्न) योग्य की अयोग्य, यावर मी मत व्यक्त करणार नाही. – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री