बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी हा भारतासाठी चिंतेचा विषय बनला असतानाच आता बिहारमधील उत्तर दिनाजपूरमध्ये चोप्रा-फतेहपूर चौकीजवळ ८० मीटरचा बोगदा आढळून आला आहे. तेथील स्थानिकांनी या बोगद्याविषयी माहिती दिल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी पाहणी केल्यानंतर त्यांना हा बोगदा आढळून आला. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, बीएसएफने सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली आहे. दरम्यान, या बोगद्याचा वापर जनावरांच्या तस्करीसाठी अथवा घुसखोरीसाठी केला जात असावा, अशी शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

बीएसएफ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, स्थानिकांनी या बोगद्याबाबत माहिती दिली. चोप्रा – फतेहपूर सीमा चौकीजवळ ८० मीटरचा बोगदा आढळून आला. बोगद्याची पाहणी केली असता धक्कादायक बाब समोर आली आहे. बांगलादेश सीमेपासून अवघ्या ५० मीटरपर्यंत या बोगदा खोदण्यात आला होता, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, हा बोगदा ४ फूट उंच आणि २ फूट रुंद आहे. गोवंश तस्करी किंवा घुसखोरीसाठी या बोगद्याचा वापर केला जात असावा, अशी शक्यता बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. बांगलादेशमधून घुसखोरीची शक्यता अधिक असून, त्यादृष्टीने तपास करण्यात येईल, असे बीएसएफच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. तर जनावरांची तस्करी होत असेल तर त्यादृष्टीनेही तपास करण्यात येईल, असेही सूत्रांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या आठवडाभरापासून हा बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे. बोगदा खोदण्याचे काम हे अधिकतर रात्रीच्या वेळी केले जात असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणी बीएसएफने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. सीमेजवळच बोगदा आढळून आल्याने स्थानिक पोलिसांसह बीएसएफने सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली असून, सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.