उत्तर कोरियाने संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख बान की मून यांचा दौरा रद्द केला असून, मून यांनी त्या देशाच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. उत्तर कोरियातील औद्योगिक विभागास ते भेट देणार होते. पाणबुडीवरून आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी उत्तर कोरियाने यशस्वी केली असली, तरी लष्करी तणाव निर्माण होईल अशा कृती त्याने करू नयेत, असा इशारा बान की मून यांनी अलीकडेच दिला होता.
मून यांनी सांगितले की, उत्तर कोरियाने राजनैतिक मार्गाने आपल्या कासाँग भेटीचे निमंत्रण रद्द केले आहे. खरेतर हा भाग उत्तर कोरियासाठी पैसे मिळवून देणारा असून त्याबाबत दक्षिण कोरियाशी वाद आहेत. दौरा रद्द करण्याच्या या निर्णयावर उत्तर कोरियाने स्पष्टीकरण केलेले नाही. उत्तर कोरियाचा निर्णय खेदकारक आहे.

अधिकाऱ्याच्या नातेवाइकांचा लादेन वृत्ताबाबत इन्कार
पीटीआय, लंडन : अल काईदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनचा ठावठिकाणा अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संघटनेला सांगितल्याच्या वृत्ताचा पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याच्या नातेवाइकांनी इन्कार केला आहे. निवृत्त ब्रिगेडियर उस्मान खालीद यांनी लादेन अबोटाबादमध्ये असल्याची माहिती दिल्याचे वृत्त होते. उस्मान हे आता ब्रिटनचे नागरिक आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी ‘द डेली टेलिग्राफ’ला सांगितले, की आमचे वडील ३५ वर्षे लंडनमध्ये राहात होते व ते वर्षभरापूर्वी वारले, पण आता त्यांचे नाव घेतले गेल्याने आम्हाला वेगळय़ाच स्थितीला सामोरे जावे लागत आहे. झुल्फिकार अली भुत्तो यांना फाशी दिल्यानंतर खालीद यांनी २५ वर्षांच्या लष्करी सेवेचा राजीनामा दिला होता. नंतर त्यांनी ब्रिटनमध्ये आश्रय घेतला. त्यांचे गेल्या वर्षी निधन झाले.

सौदी अरेबियाचे येमेनवर पुन्हा हल्ले
एएफपी, सना : सौदी अरेबियाच्या विमानांनी सना येथे आज शस्त्रसंधीनंतर प्रथमच हल्ले केले. पाच दिवसांच्या मानवतावादी शस्त्रसंधीनंतर हा हल्ला करण्यात आल्याचे प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्यांनी सांगितले. सौदी अरेबियाच्या आघाडीने सोमवारी एडनवरही हल्ले केले. हुथी बंडखोरांनी तात्पुरत्या शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आजच्या हल्ल्यात राजप्रासाद संकुलास व अली अब्दुल्ला सलेह यांच्या शिया बंडखोरांशी एकनिष्ठ असलेल्या सैनिकांच्या तळांना लक्ष्य करण्यात आले. प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्यांनी सांगितले, की फज्ज अट्टन येथील तळावर हल्ला करण्यात आला. तेथे २० एप्रिल रोजी हल्ला करण्यात
आला होता. त्यानंतरच्या स्फोटांमध्ये ३८ नागरिक ठार झाले होते.

सुरक्षेच्या प्रश्नाचा विचार करून गिलानीच्या पासपोर्टवर निर्णय
पीटीआय, नवी दिल्ली : देशाच्या सुरक्षेसह अन्य प्रश्नांबाबतचा सारासारविचार केल्यानंतर गिलानी याच्या पासपोर्टबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी बुधवारी स्पष्ट केले. गिलानी याचा अर्ज अद्याप केंद्र सरकारला प्राप्त झालेला नाही, तो प्राप्त झाल्यावर निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

गिलानींवरील र्निबध दुर्दैवी : पाकिस्तान
पीटीआय, इस्लामाबाद : हुरियतचे नेते गिलानी यांच्या परदेश दौऱ्यावर भारताने र्निबध घालण्याचा प्रकार दुर्दैवी असल्याचे मत पाकिस्तानने व्यक्त केले आहे. गिलानी यांना त्यांच्या आजारी मुलीला भेटण्यासाठी सौदी अरेबियाला जावयाचे आहे. मानवतेच्या प्रश्नावर भारतीय माध्यमांमध्ये खेळ चालला असल्याची बाब दुर्दैवी आहे, असेही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.