उत्तर कोरियाचे राष्ट्रप्रमुख किम जोंग युन् यांच्या काकांना सत्ता उलथवण्याचा प्रयत्न केल्याची शिक्षा म्हणून फाशी देण्यात आले. ‘कोरियाच्या इतिहासातील अत्यंत कारस्थानी माणूस’ म्हणून त्यांना ओळखले जात होते. जँग साँग थॅक असे त्यांचे नाव असून त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता.
जँग हे स्वत:ला किम यांचे स्पर्धक मानत होते. राजकीय वर्तुळातही जँग यांच्याकडे कोरियाचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून पाहिले जात होते. पण अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या जँग यांना आपला कारस्थानी स्वभाव सोडता आला नाही. किम जोंग युन् यांची सत्ता उलथवून लावण्याचे जँग यांचे प्रयत्न सतत सुरूच होते. एकीकडे पक्षावर वर्चस्व मिळविण्याचा तर दुसरीकडे राष्ट्रप्रमुख म्हणून सिंहासन बळकाविण्याचा त्यांचा प्रयत्न अविरत सुरू होता आणि म्हणून या देशद्रोह्य़ास फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली, अशी माहिती कोरियाच्या अधिकृत वृत्तसंस्थेने दिली.
जगभरातून टीका
अमेरिका, चीन आणि उत्तर कोरियाचा पारंपरिक शत्रू दक्षिण कोरिया यांनी या क्रूर शिक्षेबद्दल उत्तर कोरियाच्या नेतृत्वाची कठोर शब्दांत निंदा केली आहे. जपाननेही ‘असा पायंडा पडल्यास त्याची परिणती चीनमधील विध्वंसक सांस्कृतिक क्रांतीत झाल्यावाचून राहणार नाही,’ असा धोक्याचा इशारा दिला.

पाठिंबा अन् पाठीत खंजीरही
२०११ मध्ये आपले पिता किम जोंग- दुसरे यांच्यानंतर सत्तासूत्रे हाती घेणाऱ्या किम जोंग युन् यांची पकड घट्ट करण्यात ६७ वर्षीय जँग साँग यांचा मोलाचा वाटा होता, पण हळूहळू त्यांची सत्तेची महत्त्वाकांक्षा बळावली आणि त्यांनी विविध कारस्थाने करून सत्ता उलथविण्याचा ‘राघोबा’ बाणा अनुसरला. आपल्या पुतण्याला मार्गदर्शन करणाऱ्या या काकांनी अवघ्या दोनच वर्षांत सत्ता उलथवण्याचे प्रयत्न करीत पुतण्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप किम जोंग यांचे निकटवर्तीय करीत आहेत.