भारतात पतीकडून पत्नीवर बलात्कार होतो ही संकल्पनाच अस्तित्वात नाही. कारण लग्न हे तर पवित्र बंधन आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला शाखेच्या सचिव सीता आनंदम यांनी मांडले आहे. सहअस्तित्वातून आनंद प्राप्त होतो हे आपण समजून घेतले पाहिजे आणि त्यानंतरच सर्व काही सुरळित होईल असे त्यांनी म्हटले आहे.

संघाची महिला शाखा म्हणजेच राष्ट्र सेविका समितीने  यंदा ८० वर्ष पूण केली असून यानिमित्त दिल्लीत तीन दिवसांची परिषद होणार आहे. या परिषदेत लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासह अनेक ज्येष्ठ महिला नेत्या सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्र सेविका समितीच्या महासचिव सीता आनंदम यांनी इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधला. यात त्यांनी महिला प्रश्नावर त्यांचे मत मांडले. भारतामध्ये महिलांची सुरक्षा, छळ, हुंडा, स्त्रीभ्रूण हत्या हे प्रमुख मुद्दे आहेत असे त्यांनी सांगितले. घरी दारु पिऊन येणारा पती जबाबदारी घेत नाही आणि शेवटी महिलेलाच घर चालवावे लागते. आम्ही सुसंस्कृत समाज घडवण्याचा प्रयत्न करत आहोत असे त्या म्हणाल्यात.

घरात आईने मुलांना चांगले वळण लावले की मुलंही चांगल्या मार्गावरच जातात असा दावाही त्यांनी केला आहे. तोंडी तलाकच्या मुद्द्यावर सीता आनंदम म्हणाल्या, सर्व महिलांना समान न्याय मिळाला आहे. लग्न हे एक बंधन असून यात महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे. महिलांसाठी तोंडी तलाक ही पद्धत यातना देणारी आहे असे त्यांनी सांगितले. तोंडी तलाकच्या प्रश्नावर वैचारिक चर्चा होणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. महिला सबलीकरणासाठी सीमा यांनी पूर्वोत्तर राज्याचा दाखला दिला आहे. पूर्वोत्तरमधील राज्यांमध्ये महिलाच सर्व काम करतात, आदिवासी महिला समाजात महत्त्वाची भूमिका निभावतात याकडेही त्यांनी लक्ष वेधले.