केरळमधील कोटय़वधी रुपयांचा सोलर घोटाळा

कोटय़वधी रुपयांच्या सोलर घोटाळ्यात केरळचे माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी आणि माजी ऊर्जामंत्री आर्यदन मोहम्मद यांचा दक्षता विभागामार्फत तपास करण्याचा आदेश राज्य सरकारने बुधवारी दिला. यामुळे विरोधात असलेल्या काँग्रेसप्रणीत लोकशाही आघाडीला (यूडीएफ) धक्का बसला आहे.

या घोटाळ्याचा तपास करून गेल्या महिन्यात अहवाल सादर करणाऱ्या न्या. जी. शिवराजन आयोगाच्या निष्कर्षांच्या आधारे हा तपास करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी सांगितले.

चंडी, मोहम्मद तसेच आणखी एक माजी मंत्री तिरुवनचूर राधाकृष्णन या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर एका विशेष तपास पथकामार्फत या घोटाळ्याचा पुढील तपास करण्याचेही सरकारने ठरवले असल्याचे विजयन यांनी पत्रकारांना सांगितले. थंपानूर रवी आणि बेनी बेनहानन या काँग्रेसच्या दोन माजी आमदारांनाही तपासाच्या कक्षेत आणण्यात आले आहे.

या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी सरिता नायर व बिजू राधाकृष्णन यांनी सोलर पॅनेलच्या माध्यमातून अनेक लोकांची कोटय़वधी रुपयांनी फसवणूक केल्याचे आरोप झाल्यानंतर, यापूर्वीच्या ओमेन चंडी सरकारने चौकशी आयोग नेमला होता.

कुठल्याही तपासाला सामोरे जाण्याची आपली तयारी असल्याचे चंडी यांनी सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सांगितले. आम्ही कुठलीही लबाडी केलेली नसल्याने कुठल्याही तपासाला घाबरत नाही, असे ते म्हणाले. अद्याप प्रसिद्ध न करण्यात आलेल्या अहवालावर कारवाई करण्याची मुख्यमंत्री घाई का करत आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला.