‘त्या’ मुलीच्या भावाची व्यथा
आजूबाजूला भूकंप झाल्यागत वातावरण असावं आणि त्या भूकंपाचा केंद्रबिंदू आपणच आहोत, या भावनेनं जगावं लागावं, असं काहीसं आमचं झालं आहे. आठवडाभरापूर्वीचं आमचं आयुष्य आता कधीच आमच्या वाटय़ाला येणार नाही. आमच्या आयुष्यातली आताची प्रत्येक घडामोड ही दूरचित्रवाहिन्यांची ‘फ्लॅश’ झाली आहे.. अशी भावना दिल्लीतील सामूहिक बलात्कार आणि हल्ल्याचे वार झेललेल्या मुलीच्या भावाने व्यक्त केली.
बलात्कारासारख्या घटनेतील मुलीचे नाव उघड केले जात नाही. पण ही मुलगी एका चळवळीचा उगमबिंदू बनली आहे. दिल्लीतील प्रत्येक कानाकोपऱ्यात या मुलीबद्दल हळहळ व्यक्त होत आहेच पण सफदरजंग रुग्णालयापासून राष्ट्रपती भवनापर्यंत रस्तोरस्ती हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. हे सारं आपल्या बहिणीमुळे आणि बहिणीसाठी घडत आहे, हे पाहूनही मला आश्चर्य वाटतं. माझी बहिण एका आंदोलनाचा विषय ठरली आहे, हे खोलवर पोहोचतच नाही.
या मुलीला प्रसारमाध्यमांनीच दामिनी, अमानत, निर्भया अशी नावे दिली आहेत. तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज आणि तिच्या निमित्ताने व्यवस्थेतील शैथिल्याविरोधात समाजाने सुरू केलेली झुंज यातून ही नावे दिली गेली. तिचा भाऊ त्याबाबत म्हणाला, तिचे नाव उघड केले जाणार नाही, असे आश्वासन आम्हाला मिळाले होते. त्यामुळे एका वाहिनीने जेव्हा दामिनी म्हणून तिचा उल्लेख केला आणि बातम्या सुरू केल्या तेव्हा आपल्याला धक्काच बसला. तिचे नाव चुकीचे सांगितले गेले आहे आणि नंतर ते दुरुस्त करतील, अशी भीती वाटून मी लगेच प्रसिद्धी माध्यमे आणि पोलीस अधिकाऱ्यांशीही भांडलो. तेव्हा तुमची बहिण ही आंदोलनाचे केंद्रस्थान आहे त्यामुळे तिला हे नाव दिल्याचे पत्रकारांनी सांगताच मला आश्चर्यच वाटले. आमच्या चारचौघांसारख्या साध्या आयुष्यात हे सारे वेगळेच आहे. अनेकदा तर तिच्या टोपणनावाने ज्या बातम्या येतात त्या कुणा दुसऱ्या मुलीबद्दलच्याच असल्यासारख्या मी ऐकतो आणि मग एकदम हे सारं माझ्या बहिणीबद्दलचं आहे, हे भान येऊन हलतो.
सध्या या भावाने फेसबुक अकाऊंट बंद केलं आहे. कोणतीही दूरचित्रवाहिनी लावली तरी तिचाच विषय. इंटरनेट उघडला तरी तिचाच विषय. त्यातही नवनव्या अफवांनाही ऊत. दर दोन तासांनी नवी अफवा. काही वाहिन्या दुसरेच टोक गाठतात. ती मुलगी आता पूर्ण बरी आहे, तिच्या पायांवर उभी आहे, तिने सोनिया गांधींना मिठी मारली, एक ना अनेक! प्रत्यक्षात तिची प्रकृती चिंताजनक असताना अशा बातम्यांचा राग यावा की हसू यावं, हेच कळत नाही, असे तो म्हणाला.
त्यात पोलिसांनीही भर टाकली. आंदोलकांनी हिंसाचार थांबवावा, असं आवाहन करावं, अशी मागणी त्यांनी मुलीच्या वडिलांना केली. बऱ्याच प्रयत्नांनंतर ते राजी झाले. तर वडिलांचा आंदोलनालाच विरोध आहे, असं चित्र जाणीवपूर्वक रंगवलं गेलं. आम्ही आंदोलनाला का विरोध करू, असा प्रश्न करीत हा भाऊ म्हणाला की, आता आम्ही माध्यमांशी काहीच बोलायचं नाही, असा निश्चय केला आहे. नातेवाईक आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांनीही अत्याचार सुरू केले आहेत. ही मुलगी वाचेल का, तिचे लग्न होईल का, तिला मुले होतील का, त्या मित्राबरोबर तिची मैत्री नेमकी कशी होती, असे प्रश्न विचारून आप्तांनी भंडावले आहे. आम्ही आता थकून गेलो आहोत, असे या भावाने सांगितले.
राजकीय नेतेही या मुलीला भेटण्यासाठी दडपण आणत आहेत, असे सफदरजंग रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. मात्र अशी भेट मुलीच्या आरोग्याच्या दृष्टीने पूर्ण अयोग्य आहे. तिला विषाणूसंसर्ग होऊ शकतो, असे हा अधिकारी म्हणाला.