पाकिस्तान आणि भारतामध्ये मैत्रीचे संबंध निर्माण व्हायला हवेत, अशी आशा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी व्यक्त केली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगले संबंध निर्माण व्हावेत यासाठी दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात कटकारस्थाने करणे टाळायला हवे, असे नवाज शरीफ यांनी म्हटले आहे. तुर्कस्तानमध्ये पत्रकारांशी बोलत असताना शरीफ यांनी त्यांच्या निवडणूक प्रचाराचा संदर्भ दिला. ‘निवडणूक प्रचारादरम्यान मी भारतविरोधी भूमिका घेतली नव्हती,’ असे शरीफ यांनी पत्रकारांना सांगितले.

‘मी माझ्या निवडणूक प्रचारात भारतविरोधात भूमिका न घेता एक परंपरा मोडीत काढली. आम्ही (भारत आणि पाकिस्तान) एकमेकांसोबत चांगले संबंध ठेवायला हवेत. एकमेकांविरोधात कटकारस्थाने करणे टाळायला हवे,’ अशी अपेक्षा नवाज शरीफ यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षभरात भारत आणि पाकिस्तानमधील ताणले गेले आहेत. १८ सप्टेंबरच्या उरीतील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील कटुता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उरीतील दहशतवादी हल्ल्यात भारताचे १९ जवान शहीद झाले होते. उरी हल्ल्याच्या १० दिवसानंतर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केला होता. या कारवाईत भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते.

नवाज शरीफ यांनी त्यांच्या तुर्कस्तान भेटीत काश्मीर प्रश्नावर केलेल्या सहकार्याबद्दल तुर्कस्तानचे आभार मानल्याचे वृत्त डॉन या पाकिस्तानमधील वर्तमानपत्राने दिले आहे. आण्विक पुरवठादार गटात पाकिस्तानचा समावेश व्हावा, यासाठी तुर्कस्तानने घेतलेल्या भूमिकेचेही शरीफ यांनी स्वागत केले.

नवाज शरीफ यांनी पाकिस्तानमधील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली. ‘पाकिस्तानची प्रगती काहींना खुपते आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून अशा प्रकारच्या दहशवतादी स्वरुपाच्या घातपाती कारवाया केल्या जात आहेत. मात्र या संकटावर लवकरच मात केली जाईल,’ असे शरीफ यांनी म्हटले आहे.