दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका पाकिस्तानी नागरिकाला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले आहे. पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेचा एजंट असल्याची कबुली त्याने दिली आहे. दुबईहून दिल्ली विमानतळावर आलेल्या ही व्यक्ती विमानाने काठमांडूच्या दिशेने रवाना होणार होता.

मोहम्मद अहमद शेख असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शेख शुक्रवारी सकाळी सव्वासहा वाजता त्रासलेल्या अवस्थेत येथील प्रार्थना कक्षात बसल्याचे निदर्शनास आले. शेख दुबईहून विमानाने दिल्ली विमानतळावर पहाटे साडेचारच्या सुमारास पोहोचला होता. त्यानंतर ७ वाजून ४० मिनिटांनी काठमांडूच्या दिशेने उड्डाण घेणाऱ्या विमानाने त्याला जायचे होते. त्रासलेला शेख मदत कक्षातील महिला कर्मचाऱ्याकडे गेला. पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधित काही गुप्त माहिती द्यायची आहे, असे त्याने महिला कर्मचाऱ्याला सांगितले. त्यानंतर या महिला कर्मचाऱ्याने क्षणाचाही विलंब न लावता विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांना शेखबाबत कळवले. त्यांनी शेख याला ताब्यात घेतले. आयएसआयचा एजंट असून मला आता भारतात स्थायिक व्हायचे आहे, अशी माहिती शेख याने चौकशीदरम्यान दिली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.