पाकिस्तान सध्या महागाईच्या भडक्याने ‘लाल’ झाला आहे. टॉमेटोचे दर ३०० रुपये प्रतिकिलो झाले आहेत. तरीही भारताकडून टॉमेटो आयात करणार नाही, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. पाकिस्तानचे अन्न सुरक्षा मंत्री सिकंदर हयात बोसान यांनी ही माहिती दिली.

एक्स्प्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या बाजारात गेल्या काही दिवसांपासून टॉमेटोची आयात कमी होत आहे. त्यामुळे देशातील अनेक भागांत टॉमेटो प्रतिकिलो ३०० रुपये दराने विकला जात आहे. दरवर्षी पाकिस्तान भारताकडून टॉमेटोची आयात करतो. पण यावर्षी भारताकडून टॉमेटो आयात करणार नाही, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. सीमेपलिकडून येणाऱ्या कंटेनरना देशात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे मागणी असूनही त्या तुलनेत पुरवठा होत नाही, असेही वृत्तात म्हटले आहे. आता फक्त सिंध प्रांतातील उत्पादित मालाची प्रतीक्षा येथील स्थानिक व्यापाऱ्यांना आहे.

पाकिस्तानातील टॉमेटो आणि कांद्याच्या तुटवड्याचे संकट येत्या काही दिवसांतच संपेल. बलुचिस्तानमधून लवकरच माल बाजारात येईल, अशी आशा मंत्री बोसन यांनी व्यक्त केली. आपण भारताकडून भाज्या आयात करणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. लाहोर, पंजाब प्रांतातील विविध ठिकाणच्या बाजारांमध्ये टॉमेटोचे दर प्रतिकिलो ३०० रुपयांपर्यंत गेले आहेत, अशी माहिती ‘डॉन’ने दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच येथील बाजारांमध्ये टॉमेटो १०० ते १२० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. तसेच सरकारने टॉमेटोचे दर १३२-१४० रुपये प्रतिकिलो निश्चित केला होता, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. भारताकडून टॉमेटो आयात न करण्याचा सरकारने घेतलेल्या निर्णयाचे लाहोर चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीने (LCCI) स्वागत केले आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मदतच होणार आहे, असे एलसीसीआयचे अध्यक्ष अब्दुल बसित यांनी म्हटले आहे.