पाकिस्तानी हॅकर्सनी भारतातील १० विद्यापीठांना लक्ष्य केले असतानाच भारतीय हॅकर्सनेही पाकिस्तानवर पलटवार केला आहे. भारतीय हॅकर्सनी पाकिस्तान पीपल्स पार्टीची वेबसाईट हॅक केली. याशिवाय पाकिस्तानमधील आणखी ५०० वेबसाईट्सला भारतीय हॅकर्सनी हॅक केल्याचा दावा केला आहे.

मंगळवारी पाकिस्तानमधील हॅकर्सनी दिल्ली विद्यापीठ, अलिगड मुस्लीम विद्यापीठ, आयआयटी दिल्ली आणि आयआयटी बीएचयू या प्रमुख शैक्षणिक संस्थांसह किमान १० संस्थांच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाकिस्तान झिंदाबाद’ अशी घोषणा टाकून वेबसाईट हॅक केली होती. यानंतर आता भारतीय हॅकर्सनेही पाकिस्तानवर पलटवार केला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीसह सुमारे ५०० वेबसाईट्स हॅक केल्याचा दावा भारतातील हॅकर्सच्या एका गटाने केला आहे. कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा अयोग्य असल्याचा संदेशही या हॅक केलेल्या वेबसाईटवर झळकत होता. यातील बहुसंख्य वेबसाईट या पाकिस्तान सरकारच्या अंतर्गत येतात. टीम इंडियन ब्लॅक हॅट या ग्रूपने पाकमधील वेबसाईट हॅक केल्याचा दावा केला आहे.

पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षाची वेबसाईटही हॅक झाली होती. ‘पाकमधील सरकारी सर्व्हरवर टीम आयबीएच परत आली आहे. काश्मीरमधील हस्तक्षेप थांबवा’ अशा आशयाचे संदेश या वेबसाईटवर झळकत होते. हा प्रकार समोर येताच पीपीपीने त्यांची वेबसाईट तातडीने रिकव्हरही केली आहे.

‘आजतक’ने या हॅकर्सशी संपर्क साधला. या गटाने हिंदी वृत्तवाहिनीला सांगितले की, आम्ही एकट्याने नव्हे तर आमच्यासारख्या अनेकांनी एकत्र येऊन हा गट सुरु केला आहे. टीम ब्लॅक हॅट्स, यूनायटेड इंडियन हॅकर्स या गटांचा यात समावेश आहे. आगामी काळात आणखी काही वेबसाईट्स हॅक करु असा इशाराही या गटाने पाकिस्तानला दिला आहे.