पॅरिसमध्ये गेल्या नोव्हेंबर महिन्यांत करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात १३० जण ठार झाले होते त्याच आयसिसच्या गटाशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या अल्जेरिया आणि पाकिस्तानच्या प्रत्येकी एका नागरिकावर फ्रान्समध्ये दहशतवादी गुन्हे नोंदविण्यात आले .

सदर संशयितांची नावे मोहम्मद उस्मान (३५- पाकिस्तान) आणि अदेल हद्दादी (२९- अल्जेरिया) अशी असून त्यांच्यावर दहशतवाद्यांसमवेत गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. उस्मान हा लष्कर-ए-तोयबासह पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांना बॉम्ब तयार करून देत असल्याचा संशय आहे. ऑस्ट्रियामध्ये निर्वासितांसाठी उभारण्यात आलेल्या छावणीतून या दोघांना अटक करण्यात आली. पॅरिसवर करण्यात आलेल्या हल्ल्याशी यांचा संबंध असल्याचा संशय आहे. शुक्रवारी त्या दोघांना फ्रान्समध्ये पाठविण्यात आले.

उस्मान आणि हद्दादी या दोघांनी सीरियातून लेरॉस या ग्रीक बेटावर एकत्रित प्रवास केला. त्यांच्यासमवेत इराकमधील दोन भाऊ होते. त्यांनी पॅरिसमधील स्टेडियमजवळ स्वत:ला उडविले. या दोघांना प्रथम लेरॉसमध्ये पासपोर्ट तपासणी करताना अटक करण्यात आली होती. त्यांच्या पासपोर्टवर अलेप्पो हे जन्मस्थान दर्शविण्यात आले होते, मात्र अरबी भाषा बोलताना ते अडखळत होते. त्यानंतर तीन आठवडय़ाने त्यांची सुटका करण्यात आली आणि पॅरिसवरील हल्ल्यानंतर ते पश्चिम ऑस्ट्रियातील सॅल्झबर्ग येथे गेले.