जमात उद दावाचा म्होरक्या हाफिज सईदने संघटनेच्या दहशतवाद्यांनी सोमवारी भारताचे ३० जवान मारल्याचा दावा केला आहे. ‘चार पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सोमवारी अखनूरमध्ये केलेल्या हल्ल्यात ३० भारतीय जवानांना टिपण्यात आले. ही कारवाई म्हणजे लष्कर ए तोयबाकडून करण्यात आलेले सर्जिकल स्ट्राईक आहे,’ असे हाफिज सईदने म्हटले आहे. याबद्दलचे वृत्त हिंदुस्थान टाईम्सने प्रसिद्ध केले आहे. याबद्दलची एक ध्वनीफित हाती लागल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

पाकिस्तानव्याप्त काश्मीरची राजधानी असलेल्या मुझफ्फराबादमध्ये हाफिज सईदने बुधवारी एक भाषण केले. या भाषणाच्या एका ध्वनीफितीत हाफिज सईद भारतीय लष्करावर केलेल्या हल्ल्याबद्दल बोलल्याचे समजते आहे. ‘नियंत्रण रेषेपासून २ किलोमीटरवर असणाऱ्या अखनूरमधील भारताच्या लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये जनरल रिझर्व्ह इंजिनीयर फोर्सचे तीन जण मारले गेले,’ असे सईदने त्याच्या भाषणात म्हटले आहे. ‘चार तरुण मुलांनी दोनच दिवसांपूर्वी संध्याकाळी जम्मूच्या अखनूरमधील लष्करी तळावर शिरकाव केला. ही घटना आत्ताच घडली आहे. ही घटना जुनी नाही. या घटनेला फक्त दोन दिवस झाले आहेत,’ असे सईद ध्वनीफितीत उर्दूमध्ये बोलत आहेत. ही ध्वनीफित दोन मिनिटांची आहे.

‘ते लष्करी तळावर घुसले होते. लष्करी तळावर हल्ला करुन ते सुरक्षितपणे परतले. त्यांना कोणतीही इजा झाली नाही. हा एक प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक आहे,’ असा दावा हाफिज सईदने केला आहे. मात्र या हल्ल्याविषयी बोलणाऱ्या हाफिज सईदने हा हल्ला लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी केला असल्याचे म्हटलेले नाही. ‘अखनूरमधील हल्ला भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा हा बदला आहे,’ असे हाफिज सईदने म्हटले आहे. भारतीय लष्कराने उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर २९ सप्टेंबरला सर्जिकल स्ट्राइक करुन ३८ ते ४० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.

‘मोदी सर्जिकल स्ट्राईकविषयी बोलतात. त्यांना मी प्रत्युत्तर दिले आहे. नवाझ शरीफ मोदींना प्रत्युत्तर देत नाहीत. अल्लाच्या कृपेने मी मोदींना प्रत्युत्तर देतो. आणि त्यांना (मोदींना) मी फक्त मी दिलेलेच प्रत्युत्तर समजते. त्यांना इतर कोणाचेही प्रत्युत्तर समजत नाही,’ असे हाफिज सईदने म्हटले आहे.

भारताचा सर्जिकल स्ट्राइक बनावट असल्याचा दावादेखील हाफिज सईदने त्याच्या भाषणात केला आहे. ‘भारतीय लोक चांगले चित्रपट तयार करतात. मात्र चित्रपटातील कारवाई आणि प्रत्यक्षातील कारवाई यांच्यात फरक असतो. भारताकडून जगाला मूर्ख बनवण्यासाठी चांगला चित्रपट तयार करण्यात आला’, असे हाफिज सईदने त्याच्या भाषणात म्हटले आहे