भारत – पाकिस्तान सीमारेषेवरील तणाव वाढला असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे. बोधराज असे गुप्तहेराचे नाव असून त्याच्याकडून दोन पाकिस्तानी सिम कार्ड आणि सुरक्षा दलाच्या बंदोबस्तासंदर्भातील नकाशे जप्त करण्यात आले आहेत.

भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमारेषेवर तणाव वाढला असून जम्मू काश्मीरमधील यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. सांबा सेक्टरमध्ये एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे. त्याने आणखी काय माहिती मिळवली होती आणि त्याचा कट काय होता याचा पोलीस तपास करत आहेत.  तर दुसरीकडे सीमा रेषेवर शुक्रवारी रात्रीपासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. राजौरी सेक्टरमधील मांजाकोट येथे पाकिस्तानी सैन्याने भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. भारतीय सैन्यानेही पाकला चोख प्रत्युत्तर दिले आहे. तर आरएस पुरा सेक्टरमध्येही पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

शुक्रवारी सकाळीही पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. हिरानगर सेक्टरमधील बोबीयान येथे पाकिस्तान सैन्याने गोळीबार केला होता. भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या सात जवानांचा मृत्यू झाला होता. तर आणखी एका घटनेत सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता.  दरम्यान, पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असतानाच केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज आहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय जवान चोख प्रत्युत्तर देत असून शस्त्रसंधींचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊ अशा शब्दात आहिर यांनी पाकिस्तानला खडसावले आहे.