अण्वस्त्र प्रसारबंदी म्हणजे एनपीटीच्या कार्यकक्षेबाहेर असलेल्या देशांना समान निकष लावल्यास अणुसाहित्य पुरवठादार गटाच्या (एनएसजी) सदस्यत्वासाठी भारतापेक्षा पाकिस्तानच अधिक पात्र असून आमचा दावा प्रबळ आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्र कामकाज सल्लागार सरताज अझीझ यांनी सांगितले.

अझीज यांनी सांगितले की, जर एनपीटीवर स्वाक्षरी न करणाऱ्या देशांचा विचार एनएसजी सदस्यत्वासाठी करायचा असेल तर पाकिस्तानची बाजू भारतापेक्षा वरचढ आहे यात शंका नाही कारण पाकिस्तानचे राजनैतिक पातळीवर अनेक देशांशी चांगले संबंध आहेत त्यांच्याशी आम्ही बोलणी करू शकतो. पाकिस्तानला एनएसजी सदस्यत्वाची गुणवत्तेच्या आधारावर जास्त संधी आहे. भारतानंतर या सदस्यत्वासाठी अर्ज करण्याचा आमचा इरादा होता खरे तर तीन महिन्यांपासून आम्ही या सदस्यत्वासाठी अर्ज तयार ठेवला होता. पाकिस्तानला निकषाधारित पाठिंबा मिळत आहे. गेल्या आठवडय़ात रशिया, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया यांच्या परराष्ट्र मंत्र्यांना आम्ही दूरध्वनी केला होता. दक्षिण कोरिया यापुढे एनएसजीचा प्रमुख असणार आहे त्यामुळे आमची मते त्यांच्या कानावर घातली असून निकषांच्या आधारे एनएसजी सदस्यत्वासाठी निवड करा असे आम्ही सांगितले असून चीनने आम्हाला पाठिंबाही दिला आहे. भारताला जर सदस्यत्व मिळणार असेल तर पाकिस्तानलाही मिळायला काही हरकत नाही कारण त्यासाठी आमची पात्रता आहे.

अणुशास्त्रज्ञ अब्दुल कादीर खान यांच्या अण्वस्त्र प्रसाराबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, ती गोष्ट आता जुनी झाली. पाकिस्तान आता अण्वस्त्रांची सुरक्षा व्यवस्थित करीत आहे. १९७४ मध्ये भारताला शांततामय कारणांसाठी अणुसाहित्य दिले होते पण त्यांनी गैरवापर करून अणुस्फोट केला त्यातूनच एनएसजीची स्थापना झाली. भारतातून अणुविखंडन साहित्य चोरीस गेल्याच्या घटनाही घडल्या, पाकिस्तानात असे काही घडलेले नाही. इस्लामी जग व चीन यांच्या विरोधात भारताला सहकार्य करण्याचे धोरण अमेरिकेने अवलंबले आहे. आमचे त्यावर काही म्हणणे नाही कारण सार्वभौम देश म्हणून त्यांनी कुणाशी कसे संबंध ठेवावे हा त्यांचा प्रश्न आहे, पण दक्षिण आशियातील समतोल ढळू दिला तर आमचे प्रश्न वाढतील.