भारताला युद्धापासून परावृत्त करणे हेच पाकिस्तानकडील अण्वस्त्रांचे मुख्य उद्दिष्ट असल्याची माहिती सीआरएसच्या (काँग्रेशनल रिसर्च सर्व्हिस) अहवालात उघड झाली आहे. सीआरएस ही अमेरिकन काँग्रेसची स्वतंत्र शाखा असून त्यांच्यातर्फे नियमित पद्धतीने विविध विषयांवरील अहवाल तयार केले जातात. पाकिस्तानकडे सध्याच्या घडीला तब्बल ११० ते १३० किंवा त्यापेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत.  इस्लामाबादमध्ये अण्वस्त्रांचे सुट्टे भाग तयार करण्याच्या सुविधेत भर घालण्यात आली असून या माध्यमातून नवीन अण्वस्त्रे आणि प्रक्षेपकांची निर्मिती करण्यात येत असल्याचे ‘सीआरएस’च्या अहवालात म्हटले आहे. सीआरएसच्या या २८ पानी अहवालात भारताला लष्करी कारवाईपासून परावृत्त करण्यासाठीच पाकिस्तानकडून अण्वस्त्रांची निर्मिती केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, पाकिस्तानकडून करण्यात येत असलेली नव्या पद्धतीच्या अण्वस्त्रांची निर्मिती आणि भारताला पूर्णपणे अटकाव करण्यासाठी अंगिकारण्यात आलेली तत्त्वप्रणाली चिंतेचा मुद्दा असल्याचेही या अहवालात सांगण्यात आले आहे.