पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांच्याविरोधात गुप्तहेर असल्याचा ठोस पुरावा नाही अशी कबुलीच पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी दिली आहे. कुलभूषण जाधव हे भारताचे गुप्तहेर नसल्याचा दावा केंद्र सरकारने यापूर्वीच केला होता.

मार्च महिन्यात पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातून कुलभूषण जाधव यांना पाकमधील सुरक्षा यंत्रणांनी अटक केली होती. मूळचे मुंबईचे असलेले कुलभूषण जाधव हे नौदलातील माजी अधिकारी आहेत. मुदतीपूर्वीच त्यांनी निवृत्ती स्वीकारली होती. निवृत्तीनंतर त्यांनी जहाजाने मालवाहतूक करण्याचा व्यवसाय सुरु केला होता. जाधव यांना आमिष दाखवून बलुचिस्तानात नेण्यात आले होते. ते भारताचे नागरिक आहेत, पण ते गुप्तहेर नाहीत असे केंद्र सरकारचे म्हणणे होते. पण पाकिस्तान मात्र कुलभूषण जाधव हे भारतीय गुप्तहेर असल्याचा दावा केला होता.

१० महिन्यानंतर पाकिस्तानचा दावा चुकीचा असल्याचे समोर आले आहे. खुद्द सरताज अझीझ यांनी ही माहिती दिली आहे. कुलभूषण जाधव प्रकरणातील कागदपत्रांवरुन त्यांच्याविरोधात ठोस पुरावा आढळलेला नाही असे अझीझ यांनी म्हटले आहे. आता या प्रकरणातील संबंधीत यंत्रणा आम्हाला आणखी काय माहिती देते यावर सर्व अवलंबून असेल असे ते म्हणालेत. अझीझ यांच्या या दाव्याने पाकचे पितळ उघड पडले आहे. कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटले होते.