अमेरिकेतील एका महिलेला पोपटाने दिलेल्या साक्षीमुळे शिक्षेला सामोरे जावे लागण्याची घटना घडली आहे. न्यायालयाने पोपटाची साक्ष ग्राह्य धरत मिशिगनमध्ये एका महिलेला पतीच्या हत्या प्रकरणात दोषी ठरवले. पोपटपंचीमुळे एखाद्याला दोषी ठरण्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जाते.

ग्लेन्ना दुरम या महिलेने वर्ष २०१५ मध्ये पोपटासमोर पती मार्टिनवर गोळ्या झाडल्या आणि नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. घटनेवेळी घरात एकटा पोपटच होता. बड नावाच्या या पोपटाने नंतर घरातील इतर सदस्यांना मार्टिनचे अखेरचे शब्द ऐकवले होते. सुनावणीदरम्यान मार्टिनची पहिली पत्नी क्रिस्टिना केलरने कोर्टाला पोपटाची व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवली. तिने न्यायालयाला सांगितले की, आम्ही घरी गेलो तेव्हा पोपट मार्टिनच्या आवाजात वारंवार गोळी झाडू नको, अशी गयावया करत होता. याच आधारे न्यायालयाने ४९ वर्षीय ग्लेन्नाला दोषी ठरवले.

ग्लेन्नाला पुढील महिन्यात शिक्षा सुनावली जाईल. बड या दक्षिण आफ्रिकी पोपटाला सुनावणीसाठी आणण्यात आले नाही. वकिलाने पोपटाच्या साक्षीसाठी विनंती केली, कोर्टाने त्यास नकार दिला.

मिशिगनच्या सँड लेक येथे ही घटना घडली होती. मात्र, त्यात ती बचावली. मार्टिनची आई निकाल ऐकण्यासाठी कोर्टात उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, कोर्टात ग्लेन्नाला पाहून खूप दु:ख वाटले. दोषी ठरवूनही तिच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप दिसला नाही. न्यायाला झालेला विलंब योग्य नाही. पोपट कोणतेही बोल पकडतो. त्याची वाणी शुद्ध आहे, असे त्यांनी सांगितले. ग्लेन्ना मार्टिनमध्ये घरावरून वाद होते. मार्टिनचा खून त्याच्या घराचा लिलाव होण्याच्या एक महिना आधी झाला होता.