येत्या दोन वर्षांत विधानसभेच्या निवडणुका होत असलेल्या बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जनाधार कमी होत असल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला सावध केले आहे. त्याचबरोबर या दोन्ही राज्यांत पक्षविस्तार करण्यासाठी काय काय करता येऊ शकते, याच्या सूचनाची यादीच संघाने भाजपकडे दिली आहे.
संघाच्या प्रतिनिधीसभेच्या नागपूरमध्ये झालेल्या बैठकीनंतर पहिल्यांदाच भाजप आणि संघाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सोमवारी दिल्लीमध्ये बैठक झाली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, पक्षाचे सरचिटणीस रामलाल, राम माधव, संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी, सहसरकार्यवाह कृष्णा गोपाल उपस्थित होते. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारबद्दल सर्वसामान्य प्रतिसाद सकारात्मक असल्याचे यावेळी सुरेश सोनी यांनी भाजपच्या नेत्यांना सांगितले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी तेथील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सामाजिक सलोखा समित्या स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. हिंदूंमध्ये ऐक्य निर्माण करण्याच्या दृष्टीने या समित्या कार्य करतील, असेही निश्चित करण्यात आले. हिंदूंमधील जातीय तेढ कमी करण्यासाठी एक मंदिर, एक विहीर आणि एक स्मशानभूमी या उद्देशाने या समित्या काम करणार आहेत.
नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवावरही या बैठकीमध्ये चर्चा झाली. त्याचबरोबर इतर राजकीय विषय, सुधारित भूमी अधिग्रहण विधेयकामुळे निर्माण झालेली स्थिती यावरही बैठकीमध्ये चर्चा झाली.