अश्लिल छायाचित्रांसाठी ओळखले जाणारे प्लेबॉय मासिक हिजाब परिधान केलेल्या महिलेची छायाचित्रे मासिकात छापणार आहे. पहिल्यांदाच प्लेबॉय मासिकात अशाप्रकारची छायाचित्रे छापण्यात येणार आहेत. नूर टागौरी नावाची ही तरुणी अमेरिकी पत्रकार आहे. ऑक्टोबरच्या अंकात नूरची छायाचित्रे छापून येणार आहेत. जीवनात आपल्या मनाप्रमाणे वागण्यासाठी स्वतःच्या जीवाचीदेखील परवा न करणाऱ्या व्यक्तींची छायाचित्रे या अंकात छापली जाणार आहेत. २२ वर्षिय नूर अमेरिकेतील Newsy चॅनेलमध्ये काम करते. प्लेबॉयच्या फोटोशूट दरम्यान ती काय परिधान करणार आहे याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. नूर मूळची लीबियाची असून, हिजाब परिधान करून अँकरींग करणारी अमेरीकेतील ती पहिली महिला आहे. आपण काम करत असलेल्या क्षेत्रात हिजाब परिधान करून काम करताना खूप संघर्ष करावा लागल्याचे तिने म्हटले होते.

सोशल मीडियावर प्रसिध्द असलेल्या नूरला इन्स्टाग्रामवर लाखोजण फॉलो करतात. अनेकांना तिचा हा निर्णय योग्य वाटला नाही. आपली ओळख निर्माण करण्यासाठी गेली अनेक वर्षे महिलांची अश्लिल छायाचित्रे छापणाऱ्या मासिकाची नूरने निवड का केली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.