पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी दिल्ली येथे गांधी जयंतीनिमित्त हातात झाडू घेऊन देशव्यापी स्वच्छ भारत अभियानाचा शुभारंभ केला. महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर नरेंद्र मोदींनी दिल्लीतील वाल्मिकी वस्तीमध्ये साफसफाई करत स्वच्छ भारत अभियानाचा श्रीगणेशा केला. मोदींनी सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना या मोहिमेत सहभागी होण्यासाठी शपथ दिली. यावेळी मोदींनी सफाई कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.
त्यानंतर इंडिया गेट येथे विद्यार्थ्यांना संबोधित करताना भारताचे स्वप्न हे फक्त सरकारचे, मंत्र्यांचे, सामाजिक संघटना किंवा समाजसेवकांचे नसून ते सर्वांचेच आहे. त्यामुळे देशातील सव्वाशे कोटी नागरिकांनी मिळून स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले. या अभियानाला राजकीय देण्याचा प्रयत्न करून नये , असा उल्लेखही मोदींनी यावेळी केला. उपस्थित विद्यार्थ्यांना मोदींनी यावेळी स्वच्छ भारत अभियानासाठी शपथ दिली.