नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. नितीश कुमार यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेला अवघ्या देशाचा पाठिंबा आहे, असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. विशेष म्हणजे नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर या प्रकरणावर भाष्य केले. त्यामुळे आता बिहारमध्ये भाजप नितीश कुमार यांना पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे.

‘भ्रष्टाचारविरोधी लढाईत सहभागी झाल्याबद्दल नितीश कुमार यांचे खूप खूप अभिनंदन. सव्वाशे कोटी जनता तुमच्या प्रामाणिकपणाचे स्वागत आणि समर्थन करते आहे,’ असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यासोबतच ‘देशासाठी, विशेषत: बिहारच्या उज्ज्वल भविष्यासाठी राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन भ्रष्टाचाराविरोधात एक होऊन संघर्ष करणे देशहितासाठी आवश्यक आहे. ही काळाची गरज आहे,’ असे पंतप्रधान मोदींनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतरच्या अवघ्या काही मिनिटांनंतर मोदींनी ट्विटमधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

नितीश कुमार यांनी आज (संध्याकाळी) तडकाफडकी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नितीश कुमार यांनी आज संध्याकाळी राजभवनात जाऊन राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. संयुक्त जनता दलाच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत नितीश यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला. जदयूच्या आमदारांनीही नितीश यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.