पश्चिम बंगालमधील नडिया जिल्ह्य़ात एका ख्रिश्चन शाळेत दरोडेखोरांनी वयस्कर ननवर (जोगीण) केलेला सामूहिक बलात्कार आणि हरियाणाच्या हिस्सारमधील चर्चमध्ये झालेली तोडफोड प्रकरणी पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) चिंता व्यक्त केली आहे. पीएमओने दोन्ही घटनांबाबत केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल मागवला आहे. ‘पीएमओ’ने टि्वटच्या माध्यमातून ही माहिती दिली.
दरम्यान, सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी एकूण १० जणांना ताब्यात घेतले असून दरोडेखोरांनी बारा लाखांची लूटही केली होती.

यापूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयानेही पश्चिम बंगाल सरकारकडून अहवाल मागवला होता. गृह मंत्रालयाने राज्य सरकारला याबाबत सविस्तर माहिती मागवताना कॉन्वेंटमध्ये योग्य सुरक्षा होती का, असा सवालही केला आहे. त्याचप्रमाणे भविष्यात अशाप्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी राज्य सरकार काय उपाययोजना करत आहे, याबाबतही माहिती मागवली आहे.