काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस संसदीय सदस्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. देशातील जनतेला एकीकडे अडचणींचा सामना करावा लागत आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना फक्त ‘टीआरपी’च्या राजकारणातच रस आहे, अशी टीका करत अकार्यक्षम पंतप्रधानांनामुळे देशाचे मोठे नुकसान होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अनुपस्थितीत राहुल गांधींनी पहिल्यांदाच या बैठकीचे नेतृत्व केले. बैठकीत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांनी सुरूवातीपासूनच पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले होते.

ते म्हणाले, स्वत:च्याच प्रतिमेत गुरफटलेला पंतप्रधान काँग्रेसने देशाला दिलेला नाही. ‘एकला चलो रे’ धोरण स्वीकारणारा पंतप्रधानही काँग्रेसने दिलेला नाही. पण आताचे पंतप्रधान हे कोणालाच विश्वासात न घेता पुढे जात आहेत. आपण देशाचा गाडा हाकताना सर्वांना विश्वासात घेऊन तो पुढे नेणे आवश्यक आहे. पण यांच्या कार्यकाळात असे होताना दिसत नसल्याचेही ते म्हणाले. पंतप्रधानांना फक्त राजकीय ‘टीआरपी’तच रस आहे. त्यांच्या अकार्यक्षमतेचा फटका देशातील सर्वसामान्य जनतेला बसताना दिसत आहे. आम्ही असा पंतप्रधान दिलेला नाही ज्यांची धोरणे फक्त टीआरपी भोवतीच फिरणारी असतात, असा टोला त्यांनी या वेळी लगावला.

या बैठकीस काँग्रेसचे लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य उपस्थित होते. संसदेत सध्या विरोधी पक्ष व सरकारमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर या वेळी चर्चा झाली. प्रकृती अस्वस्थतेमुळे सोनिया गांधी या बैठकीस उपस्थित राहू शकल्या नाहीत.

दरम्यान, गुरूवारी सांयकाळी संसदेतील १६ विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने संशोधित आयकर विधेयकासंबंधी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. या वेळी राहुल गांधींनी केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या धोरणावर टीका केली होती. ससंदेत विरोधी पक्षाचा आवाज दाबला जात असून मोदी सरकारने नियम धाब्यावर बसवून संशोधित आयकर विधेयक संमत केल्याचा आरोप त्यांनी केला होता. सरकारने चर्चा करण्याऐवजी इतके महत्वाचे विधेयक चुकीच्या पद्धतीने संमत केले असल्याचे त्यांनी म्हटले होते.