पाकिस्तानसोबत भारताला मैत्रीपूर्ण संबंध हवेत म्हणूनच पंतप्रधानांनी शिष्टाचार मोडून माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली होती असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. एवढेच नाही तर दहशतवादाचा बिमोड करणे ही प्रत्येक देशाची प्राथमिकता असली पाहिजे हे उद्दीष्ट जगभरात पोहचवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी झाले आहेत. पाकिस्तान हा दहशतवादाला खतपाणी घालणारा देश आहे हे देखील पंतप्रधानांच्या धोरणामुळे स्पष्ट झाले. पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला, असेही गडकरींनी म्हटले आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत होते आहे. याच वेळी नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केले. ‘एएनआय’ या वृत्तवाहिनीने या संदर्भातील ट्विट केले आहेत.

डोकलाम प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय परंपरा आणि कूटनीतीची ओळख जगाला त्यांच्या भूमिकेतून दाखवून दिली असेही गडकरींनी स्पष्ट केले. दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तान दहशतवादी संघटनांना आणि जिहादींना जन्माला घालणारा देश असल्याची टीका परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मंचावरून केली. ही टीका पाकिस्तानला चांगलीच झोंबली. ज्यानंतर भारतच दहशतवाद्यांची जननी आहे अशी टीका पाकिस्तानकडून करण्यात आली. मात्र त्यानंतर काही वेळातच काश्मीर पीडित महिलेचा फोटो दाखवताना पाकिस्तानचा खोटेपणा उघड झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुषमा स्वराज यांच्या भाषणाचे कौतुक केले. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नितीन गडकरी यांनी भारताला पाकिस्तानसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे आहेत असे म्हटले आहे.

मागील काही महिन्यांपासून पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. तर चीनही भारताला त्रास देण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करताना दिसतोय. भारताविरोधात हे दोन देश एकत्रही आले आहेत. पाकिस्तान दहशतवादी कारवाया करण्याची आणि भारताच्या कुरापती काढण्याची एकही संधी सोडत नाही. दहशतवादाच्या मुद्द्यावरही पाकिस्तानचा खोटेपणा उघड झाला आहे. या सगळ्या वातावरणात त्यांच्याशी चर्चा करायची गरज काय? किंवा मैत्रीपूर्ण संबंधांची गरज काय? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जाऊ शकतो.