देशवासियांच्या संपर्कात राहण्यासाठी ट्विटरचा सर्वाधिक वापर करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (@narendramodi) यांनी ८० लाख फॉलोअर्सचा महत्त्वाचा टप्पा बुधवारी पार केला. पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीत मोदींच्या फॉलोअर्सची संख्या तब्बल ४० लाखांनी वाढली आहे.
विशेष म्हणजे ‘ट्विटर मिरर’ या सुविधेचा वापर करणारे ते जगातील पहिले पंतप्रधान ठरले आहेत. सध्या परदेश दौऱयावर असलेल्या मोदींनी ट्विटरवरील ‘ट्विटर मिरर’ या सुविधेचा वापर केला. या माध्यमातून त्यांनी ऑस्ट्रेलिया भेटीवेळी तेथील पंतप्रधान टोनी अबॉट आणि क्विन्सलॅंड विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबत स्वतःचा सेल्फी काढला.
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात देशातील आणि परदेशातील नागरिकांच्या संपर्कात राहण्यासाठी त्यांच्याबरोबर स्वतःचे अनुभव शेअरिंग करण्यासाठी मोदींकडून ट्विटरचा परिणामकारक वापर केला जातो. मे महिन्यात लोकसभा निवडणुकीवेळी मोदींचे ट्विटरवर ४० लाख फॉलोअर्स होते. त्यामध्ये गेल्या सहा महिन्यात झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी केलेल्या ट्विटला सर्वाधिक रिट्विट मिळाले होते.