पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा हवाई दौरा करत हवाई पाहणीही केली आहे. गुजरातमध्ये आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे अशात मुख्यमंत्री विजय रूपानी, इतर मंत्री आणि अधिकारी यांनी जनतेसाठी बचावकार्य कशाप्रकारे सुरू केलं याचाही आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. राष्ट्रपतीपदाचा शपथविधी सोहळा झाल्यावर विजय रूपानी यांनी गुजरातच्या पूरस्थिती संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली होती ज्यानंतर लगेचच मोदींनी हवाई दौरा आणि पूरस्थितीची पाहाणी करण्याचं मान्य केलं.

गुजरातमध्ये जी नैसर्गिक आपत्ती आली आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी आम्ही सरकारला सर्वतोपरी सहकार्य करू असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. पुरामध्ये ज्यांचा बळी गेला आहे त्यांच्या कुटुंबाला २ लाख रूपयांची मदत आणि जखमी झालेल्या ५० हजारांची मदत पंतप्रधान मदत योजनेतून देण्यात येतील असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. सौराष्ट्रानंतर आता गुजरातच्या उत्तर भागात पावसाचा कहर माजला आहे.

सोमवारी झालेल्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे सुमारे २५ हजार पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. तर १ हजार लोकांना पुरातून वाचवण्यात आलं आहे, ज्या १५ हजार लोकांच्या घरांमध्ये पाणी गेलं होतं अशाही सगळ्याच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. इतकंच नाही तर ज्या ठिकाणी पूर येऊ शकतो किंवा पावसाचा जोर वाढू शकतो अशी गावं रिकामी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पुराच्या पाण्यामुळे मरणाऱ्यांची संख्या ७० वर पोहचली आहे.

या सगळ्यात बसपा नेत्या मायावती यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. देशातल्या इतर राज्यांमध्येही पूर आला आहे तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीनं हजर का झाले नाहीत? गुजरातमध्येच कसे काय गेले असा प्रश्न विचारत मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्यावर टीका केली आहे.