मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनारा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी मोहीम राबवणाऱ्या अफरोज शहा आणि स्थानिक रहिवासी संघटनेला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शाबासकीची थाप मिळाली आहे. अफरोज शहा आणि स्थानिक रहिवाशांनी किनारा स्वच्छ करण्यासाठी जी मोहीम राबवली त्यासाठी मी त्यांचे कौतुक करतो असे मोदींनी मन की बात या कार्यक्रमात म्हटले आहे. स्वच्छता अभियान आता जनआंदोलनाचे रुप धारण करत असून आता शहरांमध्येही स्वच्छतेसाठी स्पर्धा सुरु झाल्याचे मोदींनी आवर्जून नमूद केले.

मुंबईतील वर्सोवा समुद्र किनारा अफरोज शहा आणि स्थानिक रहिवाशांनी स्वच्छ केला होता. किनाऱ्यावरील प्लास्टिकचा कचरा गोळा करुन हा किनारा आता प्लास्टिकमुक्त झाला आहे. ८५ आठवड्यांमध्ये सुमारे ५० लाख किलो कचरा गोळा करण्यात आला. ऑक्टोबर २०१५मध्ये अफरोज शहा यांनी सुरु केलेल्या मोहीमेत सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पण नंतर काही दिवसांनी महापालिका आणि परिसरातील अन्य नागरिकही यात सहभागी झाले. वर्सोवाच्या रहिवाशांनी राबवलेल्या स्वच्छता अभियानाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घेतली. मन की बातमध्ये मोदींनी जाहीरपणे अफरोज शहा यांच्या मोहीमेचा उल्लेख करत त्यांचे कौतुकही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यंदाची मन की बात वैशिष्ट्यपूर्ण ठरली. भाजपाध्यक्ष अमित शहा हे दिल्लीत गरीबांच्या वस्तीमध्ये जाऊन ‘मन की बात’ ऐकली.

१२५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात प्रत्येक धर्माचे लोक राहतात हे आपण अभिमानाने सांगू शकतो. धर्म, जात, परंपरा आणि विचारधारा विभिन्न असली तरी यातून फक्त शांती, एकता आणि सद्भावनेचा संदेश दिला जातो असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्य सैनिक आणि महापुरुषांनी तुरुंगात असताना लिखाण केले आणि त्यामुळे स्वातंत्र्य लढ्याला आणखी बळ मिळाल्याचे मोदींनी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज जयंती असून मन की बातमधून मोदींनी त्यांना आदरांजली अर्पण केली. अंदमान निकोबारमधील सेल्यूलर तुरुंगात सावरकर यांनी एका छोट्याशा कोठडीत बसून कविता लिहिल्या. स्वातंत्र्य सैनिकांनी किती यातना भोगल्या हे यातून कळते असे त्यांनी नमूद केले. पर्यावरण दिवसानिमित्त वृक्षारोपणात सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाले असून यावरही मोदींनी भाष्य केले. ते म्हणाले, सरकारने जनतेला उत्तर दिले पाहिजे, त्यांना हिशोब दिलाच पाहिजे. टीकात्मक आणि महत्त्वाच्या सूचना देणाऱ्यांचे मी आभार मानतो. विधायक टीकेमुळे लोकशाहीला बळ मिळते असे त्यांनी सांगितले.

Updates:

११:२५: सरकारला तीन वर्ष पूर्ण झाले, जनतेला उत्तर देणे हे सरकारचे काम: मोदी

११:२३: वर्सोवा समुद्रकिनारा स्वच्छ करणाऱ्या रहिवासी संघटनेचे मोदींकडून कौतुक

११:१७: ‘योग’मुळे आज जग जोडला गेला आहे: मोदी

११:१३: मन की बातमधून मोदींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली अर्पण केली.

११:१२: देशाच्या महापुरुषांनी तुरुंगात असताना लेखनाचे मोठे कार्य केले, ज्यातून स्वातंत्र्यलढ्याला बळ मिळाले: मोदी

११:०८: सुटीच्या कालावधीत तुम्ही नेहमीपेक्षा काही तरी वेगळे केले पाहिजे, माझ्या आवाहनाला देशवासीयांकडून चांगला प्रतिसाद मिळाला: मोदी

११:०४: रमझानच्या पवित्र महिन्याला सुरुवात झाली आहे. मी देशवासीयांना रमझानच्या शुभेच्छा देतो: मोदी