लोकसभा निवडणुकीतील ऐतिहासिक दारूण पराभवानंतर महाराष्ट्र व हरयाणासारखी महत्त्वाची राज्ये गमावणाऱ्या काँग्रेसमध्ये सध्या ज्येष्ठांचे मार्गदर्शन वर्ग सुरू झाले आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी आज दिल्लीत चर्चा केली. या चर्चेतून राहुल गांधी पक्षाला नवसंजीवनी देण्याचा मार्ग शोधत आहेत. आज राहुल गांधी यांनी जेष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक, कॅप्टन अमरिंदर, जनार्दन द्विवेदी, गिरिजा व्यास व प्रसारमाध्यम विभागाचे प्रमुख अजय माकन यांच्याशी चर्चा केली.
पक्षांतर्गत बदलांसाठी राहुल गांधी गेल्या दोन दिवसांपासून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करीत आहेत. गुरुवारी  राहुल यांनी आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगई, गुलाम नबी आझाद, सचिन पायलट, मीनाक्षी नटराजन, अशोक तन्वर, जयराम रमेश यांच्याशी चर्चा केली होती. काँग्रेस उपाध्यक्ष झाल्यापासून राहुल गांधी पहिल्यांदाच अशा प्रकारे वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधत आहेत. या चर्चामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित राहत नाहीत, हे विशेष. अशा चर्चामधून यापुढे राहुल गांधी यांच्याच हाती पक्षाची सारी सूत्रे एकवटण्याचा संदेश दिला जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. लोकसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरी झालेल्या राज्यांचे मुख्यमंत्री तसेच प्रदेश कार्यकारिणी बदलण्याचे अधिकार सोनिया यांनी राहुल यांना दिले होते. मात्र त्यावेळी उत्तर प्रदेशची कार्यकारिणी बरखास्त करण्याव्यतिरिक्त अन्य राज्यांमध्ये कोणताही बदल केला नव्हता. आता मात्र हरयाणा व महाराष्ट्रात सत्तेची खुर्ची गमावल्याने राहुल गांधी मोठे बदल करणार आहेत. या बदलांची चाचपणी करण्यासाठी राहुल गांधी पक्षातील ज्येष्ठांच्या ‘मार्गदर्शन वर्गा’चा लाभ घेत आहेत.