राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी तयारी सुरु केली आहे. त्यामुळे सर्वसंमतीने राष्ट्रपती पदासाठी उमेदवार निवडण्याचा भाजपसमोरील पर्याय जवळपास संपुष्टात आला आहे. अद्याप निवडणूक आयोगाने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर केलेली नाही. मात्र विरोधी पक्षांनी उमेदवार निवडीची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे सर्वसंमतीने उमेदवार जाहीर न झाल्यास भाजपला याचे खापर विरोधकांवर फोडता येईल. पंतप्रधान मोदी राष्ट्रपती पदासाठी एखादे वेगळे नाव पुढे करुन विरोधकांना आश्चर्यचकीत करु शकतात, असे भाजपचे नेते खासगीत बोलताना सांगतात.

‘विरोधकांनी राष्ट्रपतीसाठी उमेदवार दिल्यास आमच्यासमोर निवडणूक लढवण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल,’ असे भाजपमधील एका वरिष्ठ नेत्याने सर्वसंमतीच्या उमेदवाराबद्दल बोलताना सांगितले. यासोबत विरोधकांनी सर्वसंमतीचा आदर केल्यास आम्ही त्याचे स्वागतच करु, असेदेखील त्यांनी सांगितले. राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीत भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न काँग्रेसने सुरु केला आहे. विरोधकांना झालेल्या या घाईवरुन भाजपने टीका करण्यास सुरुवात केली आहे. सर्वसंमतीने उमेदवार निश्चित न झाल्यास भाजपचे नेते विरोधकांना घेरण्यासाठी सज्ज आहेत.

मागील काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांमधील अनेक बड्या नेत्यांशी सर्वसंमतीच्या उमेदवाराबद्दल चर्चा केली. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपला अस्मान दाखवण्याठी काँग्रेस नेतृत्त्वाने जोरदार तयारी सुरु केली आहे. २००२ मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने एपीजी अब्दुल कलाम यांना सर्वसंमतीने राष्ट्रपती पदाचे उमेदवार घोषित केले होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कलाम यांच्यासाठी अर्ज भरला होता. केवळ डाव्यांनी स्वतंत्र उमेदवार दिला होता.

२००७ मध्ये यूपीएकडून प्रतिभा पाटील यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी पुढे करण्यात आले. तेव्हा तत्कालीन उपराष्ट्रपती आणि भाजपचे वरिष्ठ नेते बी. एस. शेखावत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे भाजपने राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली. २०१२ मध्ये प्रणव मुखर्जी यांचे नाव निश्चित करताना यूपीए सरकारला बरेच प्रयत्न करावे लागले होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधकांकडे पाठिंबा मागितला. मात्र ममता बॅनर्जी आणि मुलायम सिंग यांनी पाठिंबा देण्यास नकार दिला. आठवड्याभरानंतर भाजपकडून पी. ए. संगमा यांनी निवडणुकीत उडी घेतली.

यंदाच्या निवडणुकासाठी काँग्रेसने इतर विरोधी पक्षांच्या मदतीने उमेदवार निश्चित करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे काँग्रेसने सर्वसंमतीचा उमेदवार घोषित होऊ दिला नाही, अशी टीका भाजपकडून केली जाऊ शकते. ‘मोदींच्या आश्चर्यकारक निर्णय क्षमतेला कमी लेखू नका. पंतप्रधान मोदी अचानक असा उमेदवार पुढे आणू शकतात, ज्यामुळे विरोधकांना माघार घ्यावी लागू शकते,’ असे भाजपच्या एका नेत्याने म्हटले.