पंतप्रधान यिंगलुक शिनावात्रा यांना सत्ताभ्रष्ट करणाऱ्या सरकार विरोधी आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी थायलंडची राजधानी बँकॉक आणि त्याच्या आसपासच्या परिसरात साठ दिवसांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मंत्रीमंडळाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती उपपंतप्रधान सुरपाँग थोविचाकचैकुल यांनी दिली. बुधवारपासून ही आणीबाणी लागू होणार आहे.
 आणीबाणी लागू केल्यामुळे, संचारबंदी लागू करणे, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता, अटकसत्रे, प्रसारमाध्यमांवर बंदी, पाचापेक्षा अधिक लोकांचा सहभाग असलेल्या राजकीय सभांना मज्जाव करणे अशा उपाययोजना करण्याची सरकारला मुभा मिळणार आहे. सरकारविरोधी आंदोलकांनी अत्यंत हिंसक वळण घेतल्याने, आणीबाणी लादण्यावाचून पर्याय उरला नसल्याचे स्पष्टीकरण थायलंडचे काळजीवाहू कामगार मंत्री चालेर्म युबामृंग यांनी दिले.
एकीकडे देशातील प्रमुख विरोधक असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाने २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार घालणार असल्याचे जाहीर केले आहे, तर २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या प्रस्तावित निवडणुका पुढे ढकलल्या जाव्यात अशी निवडणूक आयोगाची भूमिका आहे.