पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी पोलीस आणि निमलष्करी दलाने शांती समितीच्या सदस्यांवर आणि आंदोलकांवर हल्ला केल्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली आहे. सात डिसेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये हाजिरा पूंच सेक्टरमधील टाटरी नोट येथील क्रॉसिंग पॉइंटवर शांती समितीचे सदस्य शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करीत होते त्यांच्यावर पोलिसांनी आणि निमलष्कराने लाठीहल्ला केला.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये होणाऱ्या मानवी अधिकार उल्लंघनाच्या विरोधात ही निदर्शने केली जात होती. या भागात जिहादी कारवाया वाढल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्याविरोधात निदर्शने होत होती.
पोलिसांनी अचानकपणे सुरू केलेल्या लाठीहल्ल्यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत.

टाटरी नोट क्रॉसिंग पॉइंटकडे जाणाऱ्या आंदालकांना पोलिसांनी अडवले आणि त्यांच्यावर लाठीहल्ला केला. या भागात हिज्ब उल मुजाहिदीन , द हरकत उल अन्सार, अल बद्र, लष्करे तैय्यबा आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी गटांनी आपली प्रशिक्षणे शिबिरे लावली आहेत.

हे दहशतवादी गट भारतामध्ये आपले दहशतवादी पाठवून उच्छाद मांडतात. उरी आणि नागरोटामधील हल्ले हे त्यातूनच झालेले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निदर्शने होणे हे आता नित्याचेच झाले आहे. त्या या निदर्शनांमध्ये आझादीच्याही घोषणा दिल्या जातात. पाकिस्तान मुस्लीम लीगने विधानसभा निवडणुकीमध्ये ४२ पैकी ३२ जागा जिंकल्या होत्या. या निकालाच्या सत्यतेवरुन देखील तेथे निदर्शने झाली होती.

त्यानंतर मुझफ्फराबाद, कोटली, चिनारी आणि मीरपूर भागात निदर्शनांचे लोण पसरले. निवडणुकांच्या वेळी सरकारने माध्यमांना या भागातील वृत्तांकनावर निर्बंध लादले होते. खऱ्या मतदारांना मतदान करण्यावरही बंदी लादण्यात आली होती.

त्यामुळेच, येथील लोकांनी पुन्हा निवडणुका घेऊन निःपक्ष अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली निवडणूक घेतल्या जाव्यात अशी मागणी त्यांनी केली होती. केवळ पाकव्याप्त काश्मीरच नव्हे तर बलुचीस्तान प्रांतातही मानवी अधिकारांचे उल्लंघन होत आहे. बलुचीस्तान प्रांतातील नागरिकांनी भारत सरकारला हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.